किस्सा रविवार दुपारच्या मॅच चा


“ऐ तुझ्याकडे किती पैसे आहेत ?” चेतनने विचारले.

मी पण लगेच उत्तर दिले, “५ रुपये  का पिक्चरला जायच आहे का?”

“अरे, मोठा हो, लहान आहेस का पिक्चर बघायला?”

हाच काल म्हंटला होता पिक्चरला जाऊ  बरेच दिवस झाले थिएटरला गेलो नाही  जरा लक्ष्मीनारायणला जाऊ… आता एका दिवसात हा लहानाचा मोठा होईल मला कसे कळणार !

पण कसे आहे मित्रांचे स्वभाव एकमेकांना चांगलेच ठाऊक असतात, हा अशी उलट सुलट उत्तर देतोय म्हणजे याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतय…यांच्यानादी लागुन आपला रविवार वाया जाणार याची भनक मला लागली  तो वाचवण्यासाठी मी पटकन बोललो, “अरे, सायकलमध्ये हवाभरून ऑइलिंग करायची आहे”

पण ऐकल तो चेतन कसा, “माझ्याकडे पंप आहे आणि ऑइलचा मोठा डब्बा आहे  आपण घरी करू सायकलचे काम”

लगेच तो अनुजकडे वळाला, “ए ढोल, तुझ्याकडे किती आहेत”

“माझ्याकडे पण ५ आहेत, पण मला  पेन घ्यायचा आहे एक  पेन पेन्सिल पण ….” त्याचे बोलणे तोडत चेतन लगेच बोलला, “माझ्याकडे एक एक्सट्रा आहे, देतो मी तुला”

अनुजचे तोंड बारीक झाले चेतनने बॉल पडण्याआधीच सिक्स मारला  थोडी सहानभूती भेटावी म्हणून त्याने माझ्याकडे बघितले  पण मी “गेला रविवार” हे expect करून, खिशातले पैसे बाहेर काढलेले होते.

प्रश्न पैसांचा नव्हता  चेतनचा आयडिया म्हणजे विकतचे दुखणे, एकदा असाच रविवार होता, एप्रिल महिना, कडक ऊन, तापलेली गच्ची, मस्त पैकी आम्ही टाकीच्या सावलीमध्ये पत्ते खेळत बसलो होतो. भाऊनी अशीच contri काढली आणि प्लॅन केला, “मी तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास आइस -क्रिम खायला घालतो”. आता एप्रिल महिना त्यात तो पुण्यातला एप्रिल महिना, कडक ऊन, कोरडं वारं आणि त्यात पुणेकर.

पुणेकर आणि पुणे दुपारी १ ते ४ झोपते, उन्हाळ्यात दोन्हीकडे एक एक तास ऍड होतो आणि पुणे १२ ते ५ झोपते. दुपारी एकला तुम्ही जर स.प.महाविद्यालयाच्या समोर उभे असाल तर, एकीकडे साहित्य परिषद आणि दुसरीकडे हिराबाग, रस्त्यावर एक कुत्र पण दिसणार नाही. टिळक रोडवर जे कोणी जागे आहेत न झोपलेली मंडळी आहेत ते सगळे तुमच्या बरोबर स.प. च्या झाडांच्या सावलीत असतील,- “ऊन उतरायची वाट बघत”.

अशा १ च्या उन्हात, चेतनने आम्हाला बिबवेवाडीत जंगली महाराज रोड, सायकलवर न्हेले, “स्नोबॉल” ची आइस -क्रिम एक नंबर असे म्हणत. जेव्हा स.प. क्रॉस केले  सगळी मंडळी आमच्याकडे अशी एकटक बघत होती…..”वेड्यांची गॅंग”, “पुण्याबाहेरचे”, हे शब्द त्यांच्या डोळ्यातूनच आमच्या पर्यंत पोहचले!

तब्बल ९ किलोमीटर सायकल मारत, त्या तापत्या उन्हात स्नोबॉल ला पोचलो

शटर वर, वाकड्या अक्षरांमध्ये, लाल पेंट ने लिहिले होते, “दुकान १२ ते ५ बंद राहील” !!. पुढचे दोन दिवस, आमच्या सगळ्यांचा चेहरा टमाट्या सारखा लाल आणि टमाट्या सारखाच सुजला होता

dukaan band rahil
Snowball, Jungli Maharaj road, Pune

प्लॅन काय आहे?

मी घाबरत घाबरत पैसे चेतन कडे दिले, अनुजचा पण नाईलाज होता, चेतन ने व्यवस्तित मोजले, १० रुपये जमा….. मग तो आमच्यातल्या सम्या कडे वळला,

सम्या आमच्यातला सर्वात शांत, खुप कमी बोलणारा पण शार्प, आणि त्याचे बोलणे पण तेवढेच शार्प. चेतन चे म्हणणे होते, गेल्या जन्मी सम्या हा हिमालयात monk  होता, पण हिमालयातले monk खुप सॉफ्ट स्पोकन असतात, आणि सम्या जरा तीक्ष्ण बोलतो, म्हणून त्याला monk पदावरून हाकलून दिले.

चेतन काही बोलण्या आधी सम्याच बोलला, “का रे चेतन, तुझ्या दुकानी (pause) घरी एक्सट्रा नोटबुक आहे का रे?’

चेतन थोडा बिचकला, वेळ सांभाळून न्हेण्या साठी एक स्माईल दिली, आणि उगाचडोक्या वरचे केस इकडंचे तिकडे केले आणि परत तिकडचे इकडे केले

सम्या ने खिश्यातुन ५ रुपये काढले, चेतनच्या हातात ठेवले, आणि थेट मर्मावर बोट टाकले, “बोल आता प्लॅन काय आहे?”

आमच्या मनातला प्रश्न सम्या ने विचारला होता, मी आणि अनुज कान देऊन ऐकू लागलो, आता काय विचीत्र प्लॅन आहे याचा

चेतनने हातातले १५ रुपये मोजले, स्वतःच्या खिश्यातुन १० रुपयांची एक नोट आणि ५ रुपयांची एकदम कोरी करकरीत हिरवी नोट जोडली, “हे झाले आपल्याकडे ३० रुपये  आता आपण मॅच खेळुयात”

“कसली?” आम्ही तिघे एका स्वरात आश्चर्याने लिटरली ओरडलो.

“क्रिकेटची…” असे चेतन एकदम सहजपणे बोलला

सायकल : एक कि दोन capacity
सायकल : एक कि दोन capacity

प्लेयिंग ११ ? ! ?

“अरे चेतन, क्रिकेटची कसली मॅच खेळतोस आपण एक तर प्लास्टिक बॉल हाल्फ पिच खेळणारे, कुठे मॅच खेळतो रे बाबा” अनुज चालू झाला.

पण शंका कुशंका काढणे अनुज ची सवय, आणि त्याची आम्हाला इतकी सवय झाली होती, कि कोणी त्याच्या शंकांचे निरसन करायला जायचा नाही.

चेतन नि:शांत पणे सायकल स्टॅन्डवरून काढली आणि तो निघाला

मला एकच आनंद होता कि कुठे लांब नाही जायचे, मी पण सायकल काढली आणि निघालो, सम्या तसे ही काही बोलत नाही, त्यामुळे तो पण शांत पणे निघाला.
अनुज ला थोड्या वेळात कळाले कि तो एकटाच बडबड करत आहे, कुठे वाद घाला, असे करत तो पण निघाला

तिघे रोडला लागलो आणि तितक्यात तन्मय दिसला तो चालत चालत आमच्याकडेच येत होता.

चेतन लगेच त्याला बोलला, “तन्मय चल, बस कॅरिअर वर”

आता ही  तन्मय आणि चेतनची जोडी एक अजबच जोडी होती, contrast ज्याला म्हणतात अशी, चेतनमध्ये जितके किडे होते तितकाच तन्मय शांत स्वभावाचा, चेतन कसा बसा चार- साडेचार फूट तर तन्मय आरामात पाच, आकार मानाने बघायला गेले तर चेतन तन्मयच्या exact अर्धा, तरी या अजब जोडीची एक खासियत होती, ते दोघे एकाच सायकलवर फिरायचे आणि journey नेहमी सुरवात याने व्हायची –  “तन्मय चल, बस कॅरिअर वर”

शरीराने डबल असलेला तन्मय निमूटपणाने कॅरिअरवर बसायचा. चेतन पैंडल मारायला चालू करायचा आणि  उतार असेल तर ५ मीटर  फ्लॅट रोड असेल तर ३ मीटर आणि चढ असेल तर १ मीटर..  सायकल थांबायची आणि पुढचा मागे आणि मागचा पुढे. वर म्हणजे हा सर्व खेळ दोघे एकहि शब्द न बोलता पार पडायचे.

दोघांचे कॉम्म्युनिकेशन वायरलेस आहे, असे आम्ही म्हणायचो.

या वेळी पण तेच झाले. त्यांचा हा खेळ होईपर्यंत आम्हीकडेला उभे राहिलो

अनुज पुन्हा चालू झाला, “अरे सम्या, त्याला सांग कुठे मॅच”, त्याचे बोलणे पुर्णहोण्याआधी सम्या, “अरे अनुज, तुझ्या सायकलमध्ये हवा कमी वाटतीये’ , अनुज उतरून बघू लागला नक्की काय, तितक्यात सम्या पेंडल मारत पुढे गेला (याला टाळणे असे म्हणतात)

तोपर्यंत चेतन तन्मयचा खेळ संपला होता, ‘अरे चला’ असे इंस्ट्रकशन देऊन चेतन निघाला.

पुढे जाऊन पार्टी डावीकडे वळली, तिथे ग्रुपचे हेमंत भेटले  ते त्यांच्या सायकल बरोबर होते. बरोबर म्हणजे ते आपल्या पायांवर चालत होते आणि एका  हातामध्ये सायकलचे सीट ढकलत पुढे-पुढे सरकत होते, मध्येच सायकलचे हॅन्डल फिरले कि सायकल वाकडी तिकडी जायची, हेमंत थांबून हॅन्डल सरळ करायचा आणि परत सीट ढकलणे चालू.

एखाद्या सायकलस्वारला सायकल ढकलताना बघून जी शंका कुठल्या हि नॉर्मल व्यक्तीला येईल ती मला आली , “का रे, सायकल  पंकचर आहे का?”

हेमंत “नाही रे, ते काय आहे मी चेतनला बोललो होतो कि पंधरा मिनटात पोचेल पण जर मी सायकलवर आलो असतो तर पाच मिनिटातच पोचलो असतो म्हणून मग चालत चालत निघालो पंधरा मिनटात पोहचू या हिशोबाने.”

उत्तर ऐकूनअनुजची जीभ आपोआप बाहेर आली मी पण डोळे एकदम बारीक करून खाली मान फिरवली.

चेतन तितक्यात आला म्हणजे तो कॅरिअर वर आला, “ए हेम्या चल लवकर” एवढेच बोलला आणि पुढे गेला, त्याच्या सारथीला त्याने थांब वगैरे सांगितले नाही, त्यामुळे ते तसेच पुढे गेले.

आम्ही पण निघालो, हेम्या ने विचारले, “अरे पण कुठे?”, पण सगळे त्या उत्तराच्या हँगओव्हरमध्ये होता

पुढे अवघ्या १०० मीटरवर प्रितेशचे घर होते, तिथे तो बिल्डिंग खाली उभा होता त्याचा कोणतरी नातेवाईक आला होता त्याच्याबरोबर गप्पा टप्पा चालू होते. तिथेच शेजारी दोन लहान कार्टी क्रिकेट खेळत होती. वायरलेस कॉम्म्युनिकेशन  ऑन झाले आणि तन्मय आपोआप प्रितेश समोर जाऊन थांबला,

मागून कॅरिअरवरून आवाज आला, “ए प्रितेश चल” , लगेच तो त्या दोन कार्ट्यांकडे वळला ,”ए चिंटू, तुला क्रिकेटची मॅच खेळायची आहे का, चल”. आता हेमंतची ट्यूब पेटली, “अरे कुठे मॅच, कोणाशी आहे मॅच, कधी घेतली, कोणी ठरवली?”, नेमक त्या वेळी ब्रेक मारून मी त्याच्या जवळ येऊन थांबला  आणि सगळ्या शंका माझ्यावर पडल्या. मी rescue करण्यासाठी बोललो , “सम्याला विचार” . आता हेमंत काय सम्याला विचारात नाही आणि विचारले तर सम्या काय त्याला नीट उत्तर देत नाही,  त्यामुळे प्रश्न तिथेच संपला.

तन्मयला पण सगळा प्रकार बहुतेक अत्ताच कळाला असावा, जर आधीच कळाला असेल तर मग तो एक चमत्कारच! anyways त्याने लगेच एका कार्ट्याला ऑर्डर दिली, “ए जा रे, प्रितेशच्या घरी जाऊन बॅट घेऊन ये आणि एक टोपी पण आन”, हे सगळं त्याने प्रितेशला न विचारता सांगितलं आणि प्रितेशला पण काही वेगळे झाले असे वाटले नाही, त्याचा नातेवाईक मात्र थोडा चक्रावला  हा कोण आहे जो डायरेक्ट घरी जाऊन हे घेऊन ये. ते घेऊन ये करणारा, पण नातेवाईक लांबचा असावा कारण त्याने हा त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न काही ओठांवर आणला नाही आणि तो गप्पच बसला.

राहिलेल्या कार्ट् तिथेच होत त्यामुळे वेळ घालवण्यासाठी त्याचा इंटरव्हिव्ह चालू झाला, “अरे, काय जमत तुला?”

“मी फास्ट बॉलर आहे… श्रीनाथ सारखा”

ते पोरगं साधारण ४-५ वी च होतं, उंची साडेतीन फुट, वजन ३० किलो, आता याने फास्ट बॉलिंग केली तर दोन टप्पे खात बॉल बॅट्समनकडे पोचेल.. पण गरज आमची होती ११ ची टीम बनवायला जरा जास्त नाही ४ जण शॉर्ट होती, त्यामुळे जास्त फाटे न फोडता, “ये चल” म्हणून मोकळे झालो. दुसऱ्या चिंटूला विचारले पण नाही  आणि त्या नातेवाईकाला पण तसेच घेतले.

पण तरी एक जण शॉर्ट पडत आहे  हा डाउट्स अनुजला आला पण नेहमीप्रमाणे तो इग्नोर पण झाला.

इडन गार्डन नंतर हेच ते ground

जिथे क्रिकेट खेळता येते ते ग्राउंड असते
जिथे क्रिकेट खेळता येते ते ग्राउंड असते

अशी ओबडधोबड टोळी घेऊन आम्ही एकदाचे टेकडीवरच्या ग्राउंडवर पोहचलो.

ग्राउंड म्हणजे शिवाजीमैदान वगेरे imagine करू नका, पुण्यात ग्राउंड म्हणजे जिथे क्रिकेट खेळतात आणि जिथे एक टप्पा आऊट नसतो -ते ग्राउंड. मग त्या ग्राउंडवर मोठ मोठे दगड, फुटलेल्या काचा, मध्येच एखादा खड्डा, त्याच्याजवळच भर उन्हाळ्यात चिख्खल असलेला खड्डा, काहीही असो, ते ग्राउंडच आहे. अशा वर खाली प्रोफाइल असलेल्या जागेत त्यातल्या त्यात सपाट पट्टी शोधायची आणि हो जा शुरु.

ग्राउंडवरती काही पोरं खेळत होती, आम्ही तिथे गेलो आणि चेतनने निगोसिएशन चालू केले,”आम्हला मॅच खेळायची आहे  कोणाची टीम आहे का.”

“आहे की”, एक काळा टी-शर्ट घातलेला  साधारण ६ फुट उंची (आमच्या पेक्षा १ फुट जास्त !) , सडपातळ  बांधा पुढे आला.

“मी आहे कॅप्टन, आमच्या फायटर टीमचा, तुमचा कॅप्टन कोण आहे.”

“तसा आम्हाला कॅप्टन नाही”, हेमंत पचकला, वायफळ प्रश्न आणि नको त्यावेळी जोरात मत टाकणे, हा शंकाकारीचा गुणधर्म.

“मी आहे”, सम्याने वेळ सांभाळत न्हेली, “कितीची मॅच खेळायची”

“५०”

५० ऐकुन जरा हवा गेली, पण चेतनपुढे सरसावला, “नको ३० ची घेऊ, पुढची ५० ची करू.”

पुढची!, ऐकून अनुज आणि हेमंत एकमेकांकडे बघू लागले . पण कोण काही बोलण्याच्या आधी ६ फुट सडपातळ बांधा बोलला, “ठीक आहे, ७ ओव्हरची मॅच ठेऊ”

“ए चला, अव्या, रव्या, पिंट्या, चिघळ्या, पाऱ्या…. चला ७ ओव्हर ची मॅच”, असे rhyme होणारे नावं घेऊन तो त्याची टीम जमवु लागला.

तितक्यात चेतन पुढे गेला, “अरे आमच्याकडे एक प्लेयर  कमी आहे, तुमच्यातला एक  एक्सट्रा आहे का?”

सम्या आमच्या दोघांकडे बघून हळूच हसत बोलला, “एक्सट्रा, आमचे एक्सट्रा सगळे घरी राहिले”  इंसाईड जोक कोणाला कळाला नाही.

पण तन्मय आणि प्रितेशला काही घेणे देणे नव्हते, एक टोपी जी प्रितेशच्या घरून आणली होती तिचे काय करायचे, ती अतिथी देवो भव करत टोपी नातेवाईकाला द्यायची कि आपल्यातल्या कोणाला द्यायची. ते दोघे त्या एक्सट्रा टोपीच्या ट्रॅक वर होते.

चेतन परतला त्याच्याबरोबर एक इसम आला, फायटर टीममधला तो एकमेव ४ फुटी प्लेयर होता  तो , त्यांनी गिफ्ट केला, “हा, अश्विन” अशी चेतननी ओळख करून दिली.

“काय करतोय तु?”

“फास्ट बॉलर आहे ”

“श्रीनाथ सारखा का?” सम्या तिथे पण चालू झाला…

टॉस, हेड काय टेल्स काय?

एक रुपयाचा कॉइन
टॉस, हेड – टेल्स?

चेतन हेमंतकडे वळाला, “जा रे हेम्या, टॉस करून ये”. टॉस करायला वेगळा कॅप्टन, पैसे negotiate करायला वेगळा कॅप्टन, अशी आमची त्रा

हेमंत आणि ६ फुट टॉसला गेले, “छापा कि काटा, हे बघ, मला छापा काटा कळत नाही”  हेमंत बोलला, “आपण, नंबर कि तीन हत्ती करायचा का?”

“ते हत्ती नाहीयेत, सिंह आहेत”, ६ फुटच्या उंची बरोबर G.K पण चांगले होते. त्याने टॉस केला  हेमंत, “नंबर” असे ओरडला आणि नंबर  पडला.

“काय करणार बॅटिंग का बॉलिंग?” या प्रश्नाला हेमंत गडबडला टॉस जिंकला तर काय हे डिस्कशनच केले नाही, आम्हीसगळे तोपर्यंत ग्राउंडच्याकडेला एक झाड होते त्याच्या आडोश्याला सायकल लावायला गेलो होतो.

आता कोणाला विचारणार हा प्रश्न हेमंतला पडला, विचार करत  करत तो ६ फुटकडे वळाला, “तुम्ही टॉस जिंकला असता तर काय करणार होता?”

६ फुटला हा मॅचच्या आधीचा बाउन्सर झेपला नाही, “बॅटिंग” असे तो एकदम काही कळण्याआधी, विचार न करता बोलून गेला.

“ठीक आहे, आमची बॅटिंग पहिली”, हेम्या बोलला. सहा फुट सडपातळ बांधा, कोणी तरी बिन पाण्याची दाढी करून गेल्यावर जे एक्स्प्रेशन  असतात, ते घेऊन तिथेच उभा राहिला  त्याला काहीच झेपले नव्हते, हेमंत तोपर्यंत आमच्याकडे धावत आला, “आपली बॅटिंग”, असे डिकलेअर केले.

सगळी मंडळी लगेच झाडाच्या आसपास बसायला दगड शोधू लागली, सावलीत pavilion!, बॅटिंग आहे तर दोन जातील बॅटिंगला, प्रितेश, तन्मय आणि नातेवाईक, तिघांना बॅटिंगची अपेक्षा नव्हती, प्लस त्यांचा टोपीचा प्रश्न अजून तसाच होता, एक इनिंग तरी सावलीत जाईल, म्हणून तो प्रश्न पुढे ढकला गेला. मेन म्हणजे फिल्डिंगला लोक कमी पडणार म्हणूनच आपल्याला बोलावले आहे, या सत्याचा साक्षात्कार त्यांना झाला होता.

सम्याने त्याच्या खिशातुन ब्रिक गेम काढली (tetris या गेमला बोली भाषेत ब्रिक गेम बोलतात!), आणि सम्याचे चालू झाले, ट्रिंग पिंग अशे आवाज त्या गेममधून बॅक ग्राउंडला चालू झाले. दोघे चिंटू पण त्यागेम कडेच लक्ष देऊ लागले.

 

सम्या ची brick game जी तो मॅच च्या वेळी खेळत बसला
सम्या ची brick game

अनुज (भावी mba) यांनी लेडरशिप रोल पत्करत बॅटिंग ऑर्डर रचायला सुरवात केली  एकदम कॉन्फिडेंटली बोलला, “चेतन, तू आणि हेमंत ओपनिंगला जा, मी वन डाउन येतो”, एवढ्यावरच त्याची लिस्ट संपली.

हेमंत चालू झाला,”आपण कसे खेळायचे आहे, अटॅक कि टिकून, टार्गेट रन रेट काय आहे आपला, ओव्हर दि टॉप मारायचा कि अलोंग दी ग्राउंड.”

चेतन एवढे प्रश्न ऐकून जरा बिथरला, याच्याबरोबर बॅटिंग करायची म्हणजे, हा आपले डोके फुल्ल पकवणार, चेतन लगेच माझ्याकडे वळला, “तू ओपनिंगला चल माझ्याबरोबर, हेमंत तू अनुज नंतर ये, लास्टला रन रेट वाढवायला तुझी गरज लागेल (आणि होपफुल्ल मी त्या वेळी आऊट झालेलो असेल) ”

दोघे  बॅट घेऊन निघाले, बॉल आमचा नव्हता समोरच्या टीमचा होता तिकडे वॉर्म अप चालू झाले होते.

अनुज तितक्यात बोलला,”अरे, आपल्या कडून अम्पायर कोण असणार?”

आता अनुजला केले असते अम्पायर पण त्याचे लक्ष म्हणजे भटकंती, हेम्याला घेऊन जायचेच असते तर बॅटिंगला नेले असते!, विराजमान मंडळी काही उठणार नव्हती, ब्रिक गेम वाले आता टर्न बाय टर्न गेम खेळत होते. त्यामुळे राहिला एकच शेवटचा श्रीनाथ – अश्विन.

आम्ही तिघे पिचकडे गेलो कसा काय माहित नाही पण मी स्ट्रायकर एन्डला होतो आणि चेतन नॉन- स्ट्रायकर  ला

trial बॉल

पुणेरी क्रिकेटचा हा एक युनिक फिचर आहे, ट्रायल बॉल हा बॉल बॉलर कसा ही टाकतो  ९० टक्के वेळा तो विकेट किपरला इकडे तिकडे जाऊन पकडून आणावा लागतो. विकेटकिपरचा वॉर्म अप होतो. ९ टक्के वेळा तो बॉल एखाद्या स्लिप फिल्डरचा वॉर्म अप करतो  आणि १ टक्के वेळा तो बॅट्समनला भेटतो. त्यात पण अलिखित नियम असा आहे की  बॅट्समनला तो परत बॉलरकडे पाठवता येत असेल तरच मारावा, उगाच शॉट मारून लाल करू नये, नाहीतर सोडून द्यावा.

माझा ट्रायल बॉल स्लिप फिल्डरकडे गेला!

आता मॅच शुरु …..

ती पहिली ओव्हर

मी बॅटिंग stance घेतला, बॉलर रन आपला जरा लांब गेला.

फास्ट बॉलर आहे, ते बघून मी अर्धा फुट crease च्या आत आलो. पांढरा टी-शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरे कॅनवसचे बूट, हातात हिरवा टेनिसचा बॉल, तो धावत आला, मी पण एकदम स्टाईलमध्ये बॅटला बॅक लिफ्ट दिली, बॅट माझ्या कानामागे उभी होईल एवढी बॅक लिफ्ट दिली, बॉलर विकेट पर्यंत आला, त्याने बॉल टाकण्याच्या हिशोबाने हात फिरवला, मी पण बॅट खाली आणायला सुरवात केली.

पहिल्या बॉलला  क्लासिक फ्रंट फूट स्ट्रेट बॅट डिफेन्स शॉट खेळण्याचा माझा प्लॅन होता.

गोलंदाजाने बॉल सोडला….. wooosshh आवाज आला…..

मला बॉल दिसलाच नाही !!….. माझी बॅट कंबरेपर्यंत येण्याआधीच बॉल विकेट किपरकडे  होता.

फास्ट बॉलर चा फास्ट बॉल
तो पहिला बॉल : आला कधी गेला कधी

चेतन ने एकदम,”वेल लेफ्”’, अशी शब्बासकी दिली

पण मला काही कळेना, मी निर्धार केला ‘फोकस, फोकस’  असे स्वतःलाच बोललो  पुढचा बॉल नीट बघू असे ठरवले, बॅक लेफ्ट आता कंबरेपर्यंतच घेतली, पुन्हा तो पांढरा घोडा आला बॉल सोडला माझी बॅट आहे तिथेच राहिली, बॉल पुन्हा विकेट किपरकडे गेला. यावेळी मला मात्र पिच वर एका ठिकाणी धूळ उडालेली दिसली, मी फक्त अंदाज लावला, टप्पा इथे पडला असेल.

चेतन तिकडे शॅडो बॅटिंग शॉट प्रॅक्टिस करत पुन्हा, “वेल लेफ्ट” ओरडला

आता तिसऱ्या बॉलला मी ठरवलं, बॅट गेली उडत आपण बॅक लेफ्ट घ्याचीच नाही, फक्त बॉलकडे लक्ष देऊ.

यावेळी बॉल बॉलरच्या हातातून निघताना मी बघितला तो पिचकडे येईपर्यंत मला दिसत होता पण टप्पा घेण्याआधी तो अदृश्य झाला, यावेळी धूळ पण उडलेली दिसली नाही, माझी बॅट आहे तिथेच होती. स्लीप, विकेट किपरने जोरात ‘oooooooohhh’ केले, बहुतेक बॉल बॅटच्या किंवा स्टंपच्या आऊटसाईड edge च्या जवळून गेला असणार आहे हा माझा अंदाज आहे.पण चेतन ने परत “ वेल लेफ्ट “केले.

आता छाती धड धड करायला लागली होती, अंगात एक हलकासा ताप पण वाटू लागला होता. मी वेळ घालवण्यासाठी स्टाईलमध्ये पुढे आलो  त्या ओबड धोबड पिचवर उगाचच बॅट आपटत होतो, टीव्हीवर मॅच बघून तेवढच शिकलो होतो! चेतन पण पुढे आला, “जरा जास्तच स्विंग करतोय हा” त्याला मी उत्तर दिले, “अरे मला बॉलच दिसत नाहीये, तू कसली स्विंग घेऊन बसला आहेस?” चेतनने एकदम शांतपणे उत्तर दिले, “घाबरू नकोस, बिनधास्त बॅटिंग कर, आपले ३० रुपये रेडी आहेत, हरलो तर देऊन टाकू, कुठे वर्ल्ड कप ची मॅच आहे ही, बिनधास्त.”

आता हे त्याने सांगायची गरज नव्हती, हरणार हे पक्के होते. पण तरी त्याच्या बोलण्याने मला थोडा धीर आला. पुढचा बॉल, आपण बॅट फिरवणारच हा निश्चय केला. अंदाज घेऊन बॉल जिथे आहे तिथे बॅट फिरवायची. बॉल आला, बॅट फिरली, बॅट ला बॉल लागला, पण तो edge होता, इतका नाजूक edge होता कि बॉल विकेट किपरकडेच गेला. “yess!!” बॉलर ओरडला , स्लिप फिल्डरनि टाळ्या पण वाजवल्या.

मी  झाडाखाली सावलीत दगड राहिला असेल तर तिकडे बसू, या हिशोबाने चालायला लागलो तिकडून अनुज पुढे सरसावला पण अचानक तो थांबला, समोरच्या टीमचे एक दोघे जण “चीटिंग, चीटिंग” असे ओरडू लागले, काय चालले आहे हे बघायला मी वळालो बघतोय काय, अम्पायर ने नो बॉल दिला होता !

नो बॉल
नो बॉल ला आऊट

आता असे झाले कि एक दोघे पुढे “चीटिंग, चीटिंग” करत पुढे गेले तर होते पण पुढे गेल्यावर त्यांना लक्षात आले कि अम्पायर तर त्यांचाच चार फूट अश्विन होता, आपल्याच माणसाशी कसे भांडायचे, यामुळे त्यांचा रोष आपोआपच मावळला आणि ते परत आपआपल्या जागी निघू लागले

मला जीवदान मिळाले!

ते परतत  असताना मला लक्षात आले कि इतका वेळ आपण फिल्ड प्लेसमेंटकडे लक्षच दिले नव्हते, इकडे बॉल दिसण्याची पंचायत, कुठे प्लेस करणार.

बॅटिंग stance घेतच होतो, तितक्यात मला आवाज आला,

“ए बॉऊन्सर टाक रे एक जरा”

आता टेनिस बॉल वर ज्यांनी क्रिकेट खेळले आहे त्यांनाच हे कळू शकते. काय कारण आहे माहित नाही, टेनिस बॉल हा नेहमी नाकाला किंवा नाक आणि डोळ्याखाली जे हाड आहे तिथेच बसतो आणि बसला कि पुढचे ५ मिनिटे काहीही कळत नाही. डोळ्या समोर अंधार पडतो विशेष म्हणजे फार अशी सूज आलीये असे पण नसते पण तरी दोन दिवस ठणक राहते.

त्यामुळे बॉऊन्सर ऐकल्यावर मी लगेच तो हुकवयाचा कसा एवढाच विचार करू लागलो. इथे हुकवणे म्हणजे hook शॉट हा विचारपण कोणी करू नका. मी फक्त तोंड वाचवणे हा विचार करत होतो

आता एक्च्युअल क्रिकेटमध्ये बॉऊन्सर डक करून म्हणजे खाली बसून हुकवतात पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये  पिचची बोंबाबोंब असते. बऱ्याच वेळा शॉर्ट पिच डिलिव्हरी येते आपण डक करतो, टिपिकल ग्राउंडचे पिच इतके वर खाली असतात कि तो बॉल बॉऊन्स होतच नाही. आपण डक करून खाली बसलेलो असतो आणि तो न बाउन्स झालेला बॉल येऊन बरोबर बसतो….आपल्या नाकावर किंवा नाकच्या किंवा डोळ्या खालच्या हाडावर !

एक्सपेरियन्स मॅटर्स! मी ठरवले कि डक नाही, सरळ स्टंप सोडून बाजूला व्हावं विकेट गेली उडत हा नाकाचा प्रश्न आहे.

बॉल आला दिसणार नव्हताच, म्हणून मी बॉलरचे हाथ फिरले कि लगेच बाजूला झालो. या गडबडीत माझी बॅट वरची ग्रीप सुटली, बॉटम हॅन्ड बाजूला झाला, बाजूला सरकताना बॅट एकाच हातात असल्यामुळे ती जरा जास्तच oscillate झाली, बॉल आला, शॉर्ट पिच होता पण बॉऊन्स झाला नाही (एक्सपेरियन्स मॅटर्स), तो खालीच राहिला आणि लेग साईडला वळला आणि माझ्या oscillate होणाऱ्या बॅटला धडकला. स्पीड इतका होता कि, लेग स्लिपच्या तिथून बॉल थेट बाउंड्रीला, और ये लगा चौका !

एक हाती मटका शॉट
एक हाती मटका शॉट

चेतन बॅटवर एका हाताने टाळ्या वाजवत, “फ्लिक, एक नंबर” चिंटू १ आणि चिंटू २ जोरात शिट्या वाजवू लागले. सम्याने चक्क ब्रिक गेम  खाली ठेऊन विचारले, “काय झाले?”

हेमंतने उत्तर दिले, “काय लेग ग्लान्स मारली, एका हाताने, शॉट ऑफ दी  मॅच” मॅचचा हा पहिलाच शॉट होता, तरी शॉट ऑफ दी मॅच कसा!, काय सांगायचे!

बॉलर आता चिढला, फास्ट बॉलरला फोर गेला कि विलक्षण राग येतो, भले तो फोर त्याने वाईड टाकल्यावर गेला असला तरी,  पुढचा बॉल हा नक्कीच जोरात वाईड असणार, रागात कधीही बॉल स्टंपात पडत नाही. ऑफ साईडला असेल तर वेल लेफ्ट नसेल तर वाईड आणि एक रन.

मी काही केले नाही, म्हणजे मला काही दिसले नाही, चेतनने ‘वेल लेफ्ट’ केले आणि मला कळले, ऑफ साईडला गेला बॉल.

पुढचा बॉल हि तसाच पार पडला. ओव्हर संपली एकदाची मी जरा रिलॅक्स झालो, एक ओव्हर ५ रन. आता मला नॉन स्ट्राईकर  एन्डला जाऊन ‘वेल लेफ्ट’ करायचे होते. टेनिस बॉल मॅचमध्ये बॉलर दिशा नाही बदलत ते टीव्हीवर इकडे बॅटस्मनच जागा बदलतात

दुसरी ओव्हर

पुढच्या ओव्हरचे पहिले दोन बॉल मी “वेल लेफ्ट” केले आणि त्यात माझे काँट्रीब्युशन म्हणून, “आरामात अजून पूर्ण इंनिंग आहे” हे ऍड केले.

चेतनला तिसराच बॉल बॉऊन्सर आला, तो बाजूला झाला, पण त्याच्या वेळी बॉल बॉऊन्स झाला इतका झाला कि चेतनच्या डोक्यावरून गेला. लगेच नो-बॉलचा एक रन आमच्या खात्यात पडला. पुढचा बॉल लेग साईडला  वाईड गेला अजून एक रन मिळाला.

मग ६ फुट सडपातळ बांधा आला  बॉलरच्या कानात काहीतरी फूस फुसला  पुढचे ३ बॉल ‘वेल लेफ्ट’ झाले. शेवटचा बॉल आत वळला, चेतनला काही कळण्याआधीच बॉल येऊन त्याच्या गुडघ्याला बेकार बसला. चेतनला काही बोलता पण येईना  मीच आपले, “सॉलिड डिफेन्स” करत बॅटवर टाळ्या वाजवत पुढे गेलो. “जोरात बसला का” मी विचारल,”हो, चालता पण येत नाहीये” चेतनच्या चेहऱ्यावर pain दिसत होते, “तू रन नको काढू, पळता पण येणार नाही” त्याने इंस्ट्रुकशन दिले.

“आधी बॅटला बॉल लागू दे, मग रनचे बघू”, मी आपला एक PJ crack केला, दोघे स्माईल करत करत आपआपल्या जागी गेलो. मी स्ट्रायकर आणि चेतन नॉन स्ट्रायकर एन्डला.

झाडा खाली सम्याची गेम संपली होती आणि आता चिंटू-१ चा गेम खेळण्याचा नंबर आला होता, त्यामुळे त्याने बळच विचारले, “स्कोर काय झाला?”

“७ रन  २ ओव्हर्स, we are maintaining good रन रेट”, अर्थातच श्री हेमंत ने रिप्लाय केला. हो रन रेट चांगला होता ! एक मटका बाउंड्री आणि ३ एक्सट्रा  रन. असो मनाची तयारी करत मी stance घेतला, बघतोय तर काय  पांढरा शर्टच्याऐवजी आता पिवळा शर्ट होता..थोड बरं वाटलं.

बॉल आला ऑफ साईडला टप्पा पडला आणि विकेट किपरकडे गेला, पण यावेळी मला चक्क बॉल दिसला होता !

पुढचा बॉल गुड लेन्थला आला  चक्क माझ्या बॅटला लागला आणि थेट मिड विकेटच्या फिल्डरकडे गेला. दृष्टी परत आली होती ! (बॉलर slow टाकत होता) पुढचा बॉल मी सरळ बॉलरकडे मारला. बॉल दिसतोय यात मला आनंद होता, रन नव्हते, आनंद होता.

पुढचा बॉल का कुणास ठाऊक वाईड पडला आणि आम्हाला एक रन मिळाला. rhythm ब्रेक झाली माझी !

पुढचा बॉल मी मस्तपैकी पिवळ्या बॉलरकडे परत मारला, पण पिवळ्या बॉल पकडण्याच्या नादात घसरला  आणि बॉल पुढे गेला  एक रन निघेल म्हणून मी धावलो पण चेतन काही अजून धावण्याच्या परिस्थितीत नव्हता, त्याने मला फक्त हात केला  आणि अर्ध्या पिच मधून मी परतलो.

रन होत नाहियेत म्हणून अचानक प्रितेशला काय झाले माहित नाही, “अरे पळा कि, रन काढा” असे तो जोर जोरात ओरडू लागला.

अचानक त्याला काय झाले कळलेच नाही, सगळे त्याच्याकडे बघत होते. विचारले तर स्कोर सांगता येणार नाही या भाऊला, थिर्ड मॅन आणि गल्लीमध्ये गोंधळ करणारा हा, अचानक काय झाले काय माहित. मला वाटतं उगाच आपल्या नातेवाईकासमोर शहाणपणा दाखवायला निघाला हा बहुतेक! तन्मय पण त्याच्याकडे काय झाले म्हणून बघू लागला त्याला वाटले उन्हामुळे भुरळ पडली का काय, चिंटू-१ ला लगेच ऑर्डर दिली, “जा रे पाण्याची एक बाटली घेऊन ये.”

पण या सगळ्याचा मोठा परिणाम पुढच्या बॉलला झाला. मी उगाच ऑफ साईडला square कट मारला आणि बॉलकडे बघत बसलो आणि वळून बघतोय काय  चेतन धावत सुटलेला अल्मोस्ट अर्ध्यात पोहचलेला. पण बॉल तर थेट फिल्डरच्या हातात गेला होता त्याला पळत आलेला बघून मी पण सुटलो. फिल्डरने बॉल विकेट किपरकडे फेकला. चेतन गुडघा दुखत असल्यामुळे एखाद्या कांगारू सारखा उड्या मारत मारत पळत होता. तो काही वेळेवर पोहचू शकला नाही आणि आमची पहिली विकेट गेली.

प्रितेश च्या बोलण्याचा परिणाम
परिणाम

“जाड्या, ढोल्या, जाड्या, ढोल्या” असा जप करत चेतन झाडाकडे वाटचाल करू लागला.

प्रितेशला कळाले आपली काय खैर नाही  त्याने चिंटू-१ ला थांबवले आणि म्हंटला, “थांब, तू एकच बाटली आणशील, मी जातो म्हणजे ४-५ बाटल्या घेऊन येतो”.  आता सायकलवर कोणीका जा बाटल्या तर तेवढ्याच येणार होत्या, पण प्रितेशने पळ काढायला चांगले कारण शोधले आणि तो सुटला.

अनुज तोपर्यंत crease पर्यंत पोचला. माझ्याकडे वळून म्हंटला, “आपला रन रेट कमी आहे, आपण एक प्लॅन करू, बाउंड्रीच्या नादी नको लागायला आपण सिंगल किंवा डबल रन काढण्यावर फोकस करू”. त्याला म्हणणार होतो मी आधी बॅटला बॉल लाव, मग प्लॅनिंग कर, पण मी स्वतःला आवरले आणि उगाच मान डोलावली.

पुढचा बॉल अनुजने मस्तपैकी ऑफला प्लेस केला आणि आम्ही एक रन धावलो. ओव्हर संपली. एकूण ३ ओव्हर ९ रन.

शेवटच्या बॉलला रन काढल्याने अनुज स्ट्राईक वर परतला आणि बघतोय काय  पांढरा घोडा परत बॉल घेऊन रन अपची तयारी करत होता.

आता आमच्या अनुजला जाड भिंगाचा चष्मा, मलाच बॉल दिसायची पंचायत याचे काय होणार मला चिंता वाटू लागली. पहिलाच बॉल बॉऊन्सर, अनुज ना डक करू शकला ना बाजूला होऊ शकला बॉल बरोबर  नाक आणि डोळ्याखालच्या हाडावर बसला, त्याचा चष्मा उडाला. अनुज एकदम सुन्न झाला बहुतेक डोळ्यासमोर अंधार पडला असावा , तो उगाच इकडे तिकडे बघत होता.

मी पुढे गेलो चष्मा उचलून दिला, “ठीक आहेस ना रे”

“अरे बेकार जोरात फेकतोय हा, भेंडी काही दिसलच नाही” अनुज चष्मा घालत  बोलला.

“हो जरा जपून”

“मी एक रन काढतो, तूच खेळ याला”, तो टायसन म्हंटला आहे ना, “Everyone has a plan, till they get punched in the face”, अनुजला आता रन रेट, एक-दोन रन, काही काळात नहव्ते, फक्त पळत दुसऱ्या एन्ड ला जायचं कसा  हाच विचार त्याच्या डोक्यात राहिला ! रन काही लगेच निघत नाही, याची मला खात्री होती, तसा मी सेफ होतो!

पुढचा बॉल अनुजला दिसला नाही, नशिबाने तो आऊट साईड ऑफ होता. त्यामुळे तो “वेल-लेफ्ट” झाला.

त्याचा पुढचा बॉल तसाच जोरात आणि तसाच दिसला नाही. उगी उगी अनुजने स्ट्रेट ड्राईव्ह सारखी बॅट फिरवली, बॉल ऑफच्या खूपच बाहेर होता, इनफॅक्ट तो वाईड  होता आणि आमच्या खात्यात एक रन ऍड  झाला.

त्या नंतरच्या बॉलला पांढऱ्या घोडाला instructions मिळाले, “अरे स्टंपात टाक कि”.. बॉल आला  अर्जुनने पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह सारखी बॅट फिरवली, बॉल स्टंपात होता आणि जरा लेगला वळाला, पुन्हा अनुजच्या बॅट आणि बॉलमध्ये चांगले एक फूट अंतर होते. या वेळी बॉल अनुजच्या पायाला लागला आणि तिथेच पडला. अनुजला कळाले हाच मौका जीव मुठीत घेऊन तो जे धावला तो थांबलाच नाही. पुढची विकेट, अम्पायर, त्याच्याहि पुढे ४-५ मीटर जाऊन तो थांबला. उगाच दुसरा रन काढायची वेळ आपल्यावर येऊ नये, याची खबरदारी म्हणून त्याने मागे वळून पण बघितले नाही!

त्याच्यामुळे मला पण नाइलाजाने पळावे लागले आणि एक रन आमच्या खात्यात आला.

जीव मुठीत घेऊन मी स्ट्राईकर घेतली, पांढरा घोडा रन अप घेत असताना विचार केला कि हि चौथी ओव्हर, रन पण जास्त नाहीत, तीनच ओव्हर राहिल्या आहेत. आता आऊट तर आऊट खेळू  म्हणजे आऊट झालो तर या पांढऱ्या घोड्यापासून तरी वाचू.

आंधळी’ हि टेनिस बॉल क्रिकेटचे एक आगळे वेगळे वैशिष्टये आहे. यात आपण बॅटिंग करताना, मनात येईल त्यादिशेने जोरात बॅट फिरवायची, दयायची घुमवून  होईल ते होईल. मला थोडा अंदाज आला कि बॉल ऑफच्या बाहेर आहे मी literally डोळे बंद केले आणि दिली घुमवून, डोळे बंद असताना एक मस्त “कट” असा आवाज आला  मी डोळे उघडले बॉल विकेट किपर आणि स्लिपच्या मध्ये टप्पा खाऊन थेट बाउंड्रीच्या दिशेने जात होता.

बऱ्याच वेळानंतर झाडाखाली बसणाऱ्यांना टाळी वाजवायला मौका मिळाला, शिट्या, एक नंबर, अशा घोषणापण झाल्या, फोर गेल्याने चेतनचा राग पण मावळला आणि तो पण जोर जोरात ओरडू लागला. हे पाहून प्रितेशला दिलासा मिळाला आणि तो परत येऊन आपल्या जागेवर बसला आणि चिंटूला सायकलची चावी दिली “पाणी घेऊन ये” असे सांगितले. प्रितेश एवढा वेळ झाडा मागे लपून बसला होता! जोर जोरात, ये ये ये, आवाजामुळे सम्याचे concentration ब्रेक झाले , सम्याने  ब्रिक गेम खाली ठेवली,”काय झाले” विचारले.

हेमंत, “एक नंबर शॉट, आऊट साईड  ऑफ स्लॅश , स्ट्रेट टू  बाउंड्री, शॉट ऑफ दि मॅच”. पुन्हा वाढीव!

पांढरा घोड्याला आता ६ फुट सडपातळ बांधानि चांगलीच तंबी दिली, “अरे, स्टंपात कळत नाही का तुला”.  बोलण्याला एका कॅप्टनची ऑथोरिटी होती, पांढरा घोडा आता बॉल स्टंपात टाकणार  मी आधीच बाजूला झालो, उगाच शरिराला इजा नको. आपल्या आंधळी काय कुठून हि मारता येईल. मी लेग साईडला एक पाऊल घेतले आणि पुन्हा आधी सारखी दिली घुमवून, डोळे अर्थात बंद होते पण पुन्हा एक “कट” आवाज आला. बघतोय काय तर बॉल माझ्या बॅटला लागून उडाला  विकेट किपरच्या डोक्यावरून, थेट बाउंड्री !!. चक्क चक्क मी consecutive बाउंड्री मारली होती. झाडाखालील मंडळींना आता उत्साह आवरेनासा झाला होता, जोशमध्ये जोरात शिट्ट्या, आरडा ओरड, फुल्ल एन्जॉय. चेतनने जोशमध्ये हेमंतलाच शाब्बासकी दिली, त्याच्यापाठीवर असला दणका बसला हेमंतला दोन सेकंद श्वास घेता येईना  पण तो हि जोशमध्ये होता, चेतनला काहीही न बोलता तो पण जोरात ये, ये, ये, करत बसला.

पुढचा बॉल ओव्हर च्या शेवट चा, चेतन ने एकदम जोरात आवाज दिला, ‘विकेट टिकाव, अजून ३ ओव्हर आहेत’

पुढचा बॉल लगेच ‘well-left’. म्हणजे मी काय चेतन चे ऐकून सोडला असे काही नाही, २ फोर बसलेला फास्ट बॉलर पुढचा बॉल खूप जोरात टाकतो, शेवटी त्याचा ego hurt झालेला असतो. तो बॉल इतका जोरात होता, कि माझी बॅट १ इंच पण हलली नाही, आणि बॉल विकेटकिपर कडे.
ओव्हर संपली, स्कोर आता ४ ओव्हर, १९ रन, थोडा respectable वाटू लागला होता.

पुढचा बॉलर स्पिनर होता. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर म्हणजे जो बॉल वळवतो हि डेफिनेशन चुकीची आहे. पिच एवढे ओबडधोबड आहे कि बॉल हा वळणारच. जो फास्ट बॉलर नाही म्हणजे जो कमी रन अप घेऊन बॉल टाकतो तो स्पिनर. स्पिनरचे एकच मेन फीचर्स, तो ” नो” किंवा “वाईड” बॉल टाकत नाही.अनुज स्पिनर विरुद्ध पट्टा शॉट प्लेअर. पट्टा शॉट हा आंधळी शॉटचा स्पेशल प्रकार आहे, यात बॅटस्मन डोळे बंद करून बॅट ऑफ साईडला पॉईंट करून आडवी धरतो आणि बॉल पडला कि १८० डिग्रीमध्ये, तो आणि बॅट दोन्ही घुमतात. बसला तर काहीही होऊ शकत  सिक्स, फोर, कॅच  आणि  फेल  गेला तर सुपडा साफ, क्लीन बोल्ड पण!

पुढच्या बॉलला आडवी धरतो ने घुमवली. ओ, सांगायचं राहिले, पट्टा शॉटमध्ये कधी कधी सिक्स, फोर, कॅच असे काहीच होत नाही बॉल विकेट किपरकडे पण जातो,, तेच झाले.

पण अनुज निराश झाला नाही  पुढच्या बॉलला पण त्याने आंधळी पट्टा स्वीप शॉट मारला, म्हणजे बॅट फिरवली  बॉल पुन्हा विकेटकिपर कडे गेला. आता एक दोन ओव्हरपूर्वी एक किंवा दोन रन पळू याची प्लॅनिंग करणारा हा अंड्या, आता का शॉट मारत आहे असा विचार तुम्ही करत असाल, पण ग्राउंडवर कोणीही करत नहव्ते. स्पिनरचे अजून एक वैशिष्ट्य आहे, कि त्यांच्या विरोधात एक तर फोर मारावा किंवा सिक्स,  नसेल जमत तर आऊट उगाच एक दोन रन काढून टाईमपास करणे अस्सल टेनिस बॉल क्रिकेटरच्या शानेच्या खिलाफ असते. अनुज त्याच philosophyचा होता.

‘कम ऑन अंड्या’ झाडाखालून चालू झाले.

अंड्याने परत पुढच्या बॉलला खालीबसून पट्टा स्वीप फिरवला, यंदा बॉल टॉप edge ला बसला आणि विकेटजवळ उभ्या असलेल्या विकेटकिपरला  दिसण्याआधीच तो त्याच्या डोक्यावरून.. थेट बाउंड्री ! यावेळी सम्यानी  विचारण्याआधीच हेमंत, “scoop शॉट, एक नंबर, बाउंड्री, शॉट ऑफ दि मॅच”. टाळ्या, ये ये, आता काही कळेना, पुन्हा फुल जोशचे वातावरण झाले.

पुढच्या बॉलला पण अंड्याने तेच केले यावेळी बॉल मस्त बॅटच्या मधोमध लागला जे उडाला ते थेट स्वीपरला थांबलेल्या फिल्डरच्या हातात.  त्याला एक इंच पण हलावे लागले नाही.  अनुजने नेम धरून त्याच्याकडे मारला होता असे वाटत होते,  पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे  त्याने नेम वगैरे काही नाही डोळे बंद करून ओढली होती.  तरी अनुज जाताना, एकदम, ‘शे, श्या’असे आवाज काढत, बॅट एका हाताने जोरात घुमवत, मान लेफ्ट राईट करत, disappointment दाखवत गेला. याला काही नाही – टीव्हीचा परिणाम म्हणतात. आऊट झाल्यावर जो डिसपॉईंटेड नाही तो खरा बॅटस्मन नाही !

आता कोण जाणार? हेमंत होता तसा  रेडी, पण तसा तो नव्हता, त्याचे काही कळणे थोडे मुश्किलच. दगडावरची मंडळी आपले आसन सोडण्याच्या मूडमध्ये नव्हती, सम्या आता २३ व्या लेव्हला पोहचला होता त्याचे टार्गेट ३० ला पोहचणे होते  शेवटी घुमून फिरून हेमंतच रेडी झाला.हेमंत आला आणि स्ट्राईक घेतली शेवटचे दोन बॉल होते. दोन्ही  बॉल त्याने एकदम स्टाईलमध्ये लेफ्ट केले. बॅट डोक्यावर सरळ आकाशाकडे पॉईंट केली होती आणि ती त्याने खाली आणलीच नाही बॉल पिचवरून विकेटकीपरकडे जाईपर्यंत, मान वळवून वळवून बघितल, पण बॅट काय हलू दिली नाही. त्या स्पिनर आणि विकेट किपरला पण ते झेपले नाही, त्यांच्या करिअरमध्ये, स्पिनरला असे ‘वेल लेफ्ट’ करणारा इसम त्यांने पहिल्यादाच बघितला होता.

स्कोर आता  ५ ओव्हर २३ ला पोचला होता.

हेमंत चालू झाला, “बघ फंडा असा आहे कि  क्रिकेटमध्ये पहिल्या ३० ओव्हरमध्ये जेवढे रन होतात, तेवढेच रन शेवटच्या २० ओव्हरमध्ये होतात  म्हणजे आपण या दोन ओव्हर मध्ये ३० रनचे टार्गेट ठेऊ”

मला काहीच झेपल नाही  ५ ओव्हर मध्ये २३ रन कसे आले आहेत? एकही रन विकेटच्या पुढे नाही सगळे रन मागच्या बाऊंड्रीला आले आहेत  बाकी एक्सट्रा आणि २ ओव्हरमध्ये ३० रन हे कसे काय, पण सवयीप्रमाणे त्याचे बोलणे मी मान डोलवत इग्नोर केले.

आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही रन करा किंवा नका करू पण जर तुम्ही खूप वेळ टिकला तर तुमची रेप्युटेशन  वाढते, मग तुम्ही पूर्णवेळ नॉन स्ट्राईकर एन्डला का असेना. माझी रेप्युटेशन वाढली होती त्यामुळे ६ फुट माझ्यासाठी फील्ड सेट करत होता वास्तविकरित्या मॅचची हिस्टरी बघता त्याने सगळे फिल्डर विकेटकिपरच्या मागे लावले पाहिजे होते पण तो अझहर सारखा फिल्ड सेट करत होता उगाच एखाद्या फिल्डरला ३-४ फुट इकडे तिकडे हलवत होता (टीव्ही चा परिणाम). तितक्यात चेतन माझ्यासाठी पाणी घेऊन आला,”तू नीट खेळ, आपला इनफॉर्म बॅटस्मन आहेस तू  आऊट नको होऊस  सावधानीने खेळ ,आपल्याकडे विकेट भरपूर आहेत तू बिनधास्त खेळ”

किस्सा रविवार दुपारच्या मॅच चाआता याला कोण सांगणार कि दोन उलट गोष्टी सावधानी आणि बिनधास्त तो एकाच वाक्यात वापरतोय !

पण त्याचा उत्साह पोहचला होता, बहुदा आपण २० च्या आत ऑल आऊट होऊ अशी अपेक्षा होती पण इकडे २३ रन झाले होते, म्हणूनच मी पाणी मागितले पण नव्हते आणि पिलो पण नाही तरी तो बाटली घेऊन आला आणि तशीच भरलेली बाटली घेऊन परत जाताना मात्र, “त्या हेम्याच काही ऐकू नकोस” असे जोरात बोलला, ते हेम्याला पण ऐकू गेले असणार, पण हेमंत त्याच्याच जगात होता.

पुढचा बॉलर फास्ट कम स्पिनर होता, फास्ट एवढा लांब रन अप नाही आणि स्पिनर एवढा शॉर्ट पण नाही तो आला त्याने बॉल टाकला त्याने बॉल टाकल्यावर मला कळले अरे हा तर लेफ्ट हॅन्डनी बॉलिंग करतोय, या आश्चर्यातच पहिला बॉल ‘वेल लेफ्ट’ झाला.

पुढचा बॉल मी मारला तर मिड ऑन कडे होता पण तो गेला मिड ऑफ कडे पण तरी एक रन पळालो.

हेमंत आता stance घेऊ लागला, २ मिनिटे त्याने बॅट आणि मिडल स्टंप align करण्यात घालवला, मग बॅटने crease ची लाईन परत ओढली. (टीव्ही, टीव्ही), इकडे तिकडे फिल्डर बघितले, मग परत इकडे तिकडे बघून फिल्डर मोजले आणि फाइनली रेडी झाला.

पुढचा बॉल यॉर्कर जो मिडल स्टंप त्याने align करताना वापरला, तोच उखडून बाहेर आला. क्लीन बोल्ड ! मगdisappoint होऊन परतला सेम अंड्याची स्टाईल मारत तो डिसपॉईंटेड होऊन परतला.

आता तन्मय उठला, “मी जाऊन येतो” असे म्हणत बॅट पकडली आणि सुटला. crease ला आला आणि काही नाही एका सेकंद मध्ये stance घेऊन रेडी, बॉल आला आणि सांगितल्याप्रमाणे तन्मय लगेच झाडाच्या दिशेने परतला…क्लीन बोल्ड! प्रितेशला माहिती होते कि आपण गेलो आणि आऊट होऊन लगेच परतलो तर चेतन आपल्याला कच्चा खाईल, त्याने हुशारीने आपल्या नातेवाईकाला पुढे केले  नवीन अनोळखी माणसाला कोण काही बोलणार नाही.

चेतन एकदम नम्र भाषेत त्याला बोलला, “निवांत रे, आऊट नको होऊस फक्त”. तो नातेवाईक आला, stance घेतला  आणि बॉल पडला रे पडला तो स्टंप समोर आडवा उभा राहिला बॉल येऊन पायाला लागला. टेनिस क्रिकेटमध्ये LBW आऊट नसतो  हॅट्रिकची नामुस्की त्याने अव्हॉइड केली. शेवटचा बॉल पण असाच आला आणि गेला, चेतनचे बोलने त्याने खूपच मनावर घेतले होते. चेतन त्याला बोलला रन करू नकोस म्हणून त्याने रन करण्याचा प्रयत्न पण केला नाही.

ओव्हर बेकार गेली  एकच रन आणि २ विकेट स्कोर आता २४ वर अडकलाआला. क्लीन बोल्ड !.

final ओव्हर

चेतन परत न मागता पाणी घेऊन आला , “शेवटची ओव्हर आहे  धु जरा पण आऊट नको होऊ शेवटपर्यंत खेळ” आणि तशीच भरलेली बाटली घेऊन परतला.

मी परत stance घेतला  ६ फुट परत फिल्ड सेट करत बसला, “ए याला एक रन देऊ, बाकीच्यांना आऊट करू” असे विकेट किपर ओरडला .बॉल शॉर्ट पिच होता मी बॅट फिरवली नेहमीप्रमाणे edge लागून बॉल उडाला पण  कॅच पकडायला कोणी नहव्ते.  मी एक रन काढला.

आता झाडा  खालून, “एक रन काढ , स्ट्राईकर रोटेड कर”, अशा सुचना त्या नातेवाईकाला येऊ लागल्या. नातेवाईक पुढdisappoint होऊन परतलाच्या बॉलला पहिल्यांदा आडवा न जाता बॅटनी मारायला गेला आणि…..क्लीन बोल्ड !

डिसपॉईंटेड होऊन परतला…

आता सगळे प्रितेशकडे बघू लागले  त्याच्या नातेवाईकाला काही बोलता येईना तर हाच टार्गेट होणार होता प्रितेशला कळले आपण आता गेलो आणि आऊट झालो तर चेतन बरोबर सगळेच लावतील. तो लगेच म्हंटला, “अरे, त्या अश्विनला बॅटिंग द्या, एवढ टीममध्ये घेतला आहे, काय वाटेल त्याला”

हेमंतने लगेच धाव घेतली आणि स्वतः अम्पायर झाला आणि अश्विन बॅटिंगला आला. “right arm fast, over the wicket” हे तो जोरात बोलला, ग्राउंडवर सगळे ‘हे काय होते’ या विचारात पडले

अश्विन हा फास्ट बॉलर आहे कि नाही माहित नाही पण तो बॅटस्मन नक्की नव्हता, पुढचा बॉल आला त्याने बॅट फिरवली, बॅट आणि बॉल मध्ये २ फुटचे अंतर होते. ‘याला पाठवायची आयडिया कोणाची?’…. प्रितेश परत झाडा मागे जाऊन लपला. पुढचा बॉल हि तसाच गेला बॅटच्या दोन फूट लांबून , झाडाखालून आता आवाज बंद झाले होते.

हेमंत पुढे आला आणि दोघांना म्हंटला ,”एक काम करा, बॉल बॅटला लागू ना लागू  तुम्ही पळत सुटा रिस्क घ्या, आऊट तर आऊट.’ बॉलरनी रन  अप घेतला, त्याने बॉल टाकला आणि मी पळत सुटलो अश्विन पण सुटला, नशिबाने बॉल बॅटची edge घेऊन गेला त्यामुळे विकेट किपरकडे थेट गेला नाही थोडा बाजूला गेला आणि मी सुखरूप पोहचलो .

आता लास्ट  बॉलला स्ट्राईक तर मिळाली पण काय करायचे मी एकदम ब्लँक होतो. आंधळी मारायची आहे, मग विचार केला डाऊन दि विकेट जाऊन ट्राय करू, निदान काही नाही तर तसाच पुढे पळत जाऊ आणि एक रन तरी मिळेल. बॉलर आला आणि त्याने नेम धरून विकेटवर बॉल टाकला  गुड लेन्थ होता. मी पण crease सोडून दोन पावले पुढे आलो आणि घुमवलेली बॅट. पुढे आल्यामुळे बॉलचा टप्पा बॅट खाली पडला आणि जो काय ‘टॅक’ आवाज आला :  बॉल बॅटला लागून जे उडाला ते थेट बॉलरच्या मागे बाऊंड्री पलीकडे, ये लागा छक्का !

लास्ट बॉल सिक्स !
लास्ट बॉल सिक्स !

झाडाखालून फुल्ल शिट्ट्या, एकमेकांना टाळ्या, फुल्ल जोश, प्रितेशपण परत आला आणि सगळे जोर जोरात, ये ये ये, शिट्या आणि कल्ला  चालू होता. मी आमच्या pavilion कडे आलो, पाठीवर इतका मार बसला कि मी शेकून निघालो, शाब्बासकीच्या नावाखाली सगळ्यांनी हात मोकळे करून घेतले. बघितल तर मी तीन आंधळी शॉट आणि बराच वेळ नॉन स्ट्राईकर एन्डला घालवला, बाकी काहीच केले नव्हते, पण त्यावेळी मला मिळालेल्या अँप्रेसिएशनला, “वासरात लंगडी गाय शहाणी” असा उत्तम वाक्प्रचार आहे !

ग्राउंडवर बरीच मंडळी मॅच पाहत जमली होती  म्हणजे आमची मॅच काय एवढी exciting नव्हती कि त्याला ऑडियन्स मिळेल, ग्राउंडवर एकच चांगले पिच होते ते खाली कधी होईल आणि ते मॅच खेळतील याची वाट बघत होते. त्यातल्या एकाने कुतूहलाने विचारले,”काय तुम्ही मॅच घेतली आहे का त्याटीम बरोब”

“हो”, हेमंत बोलला.

“किती रन झाले”

हेमंतनी  लगेच,”सात ओव्हर ३२  म्हणजे साधारण साडेचारचा रन रेट आहे…” नेहमीचे फंडे चालू.

“हो का, अरे मागच्या वेळी याच टीम बरोबर मॅच झाली होती आमची लई बेकार बॅटिंग आहे त्यांनी आम्हाला ८ ओव्हरमध्ये १०० ला चोपला होता”

.. कोणीतरी फुग्याला पिन मारली कि तो कसा फुगा फुटतो, त्या इसमाने आमच्या उत्साहाचा फुगा फोडला. चेतनने लगेच पैसे बाहेर काढले आणि आपल्याकडे ३० रुपये आहेत ना हे कन्फर्म केले.

आता आमची फिल्डिंगची वेळ अली होती.

2 Comments

  1. Nitin
    February 19, 2022
    Reply

    Waiting for part 2

  2. Priya
    July 26, 2022
    Reply

    Kaay tareech kaay

    Catalogue pahije?

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *