रात्रीचा ऐकलेला अभ्यास

History आणि Geography

Information Overload

“अरे समीर, आज कसा काय आलास?”, काकूंनी विचारले.

चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला!

नेहमीप्रमाणे  चेतनने दोन्ही पार्टीना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला “तू ये” एवढेच बोलला होता आणि चेतन बोलवत आहे म्हणजे काहीतरी टाईमपासच असणार  या हिशोबाने समीर पण आला. त्यामुळे उत्तर काय दयायचे समीरला कळेना. “काकू लॉक लावायचे राहिले” असे बोलून पटकन दारा बाहेर पडला.

समीरचा आवाज ऐकून चेतन हातातले थालपीट  सोडून किचन मधून धावत हॉलकडे पळाला.

आपलीपोल उघड पडू नये म्हणून, चेतन पटकन बोलला, “अग आई, आम्ही दोघे अनुजकडे अभ्यासाला जाणार आहोत  म्हणून तो आला आहे.” दाराबाहेर उभा असलेल्या समीरने ‘अभ्यास’हा शब्द ऐकला आणि अजूनच चक्रावला, ‘अरे कसला अभ्यास, मी इकडे दप्तर पण आणले नाही!’

“अनुजकडे कशाला? इकडेच करा की”, काकूंनी सुचवले.

“नाही आम्हाला एकत्र अभ्यास करायचा आहे”, चेतन ने तत्परतेने उत्तर दिले

“का?”, काकूंनी Inquiry चालू ठेवली.

“आम्ही तसे ठरवले आहे”, चेतन ने आपण कुठल्यातरी कंपनीचे CEO आहोत आणि हा माझा एक्सजीकीटीव्ह डिसिजन आहे, अशा थाटात उत्तर दिले. चेतनच्या आवाजातील कॉन्फिडन्स (over) ऐकून समीर परत घरात शिरला. आज हा पिटणार आणि ते बघायची संधी सुटायला नको हा समीरचा विचार.

“काही नका ठरवू ,  इकडेच करा अभ्यास”, काकू ह्या काहीही झाले तरी प्रेसिडेन्ट होत्या, CEO चे प्रपोसल उचलून फेकून दिले.

“अग, अनुजकडून आम्हाला geographyचा  एक चॅप्टर समजून घ्यायचा आहे”, चेतनने नवीन बॉल टाकला.

“का? तुम्हाला नाही येत का?”, काकूंनी त्या बॉलला टप्पा पडण्या आधीच सिक्स मारला.

बुद्धिबळामध्ये याला चेक अँड मेट असे म्हणतात. चेतनला पूर्णपणे कोंडीत अडकवणारा प्रश्न होता, “हो” बोललो तर मग जायची गरज काय आणि “नाही” बोललो तर शाळेत काय झोपा काढतोस का म्हणून एक दोन धपाटे बसणार होते.

पण चेतन हा हार मानणाऱयातला  नव्हता. चेतनने विचारपूर्वक आपला डिफेन्स चालू केला, “अगं, आम्ही प्लॅन केला आहे प्रत्येक जण एक चॅप्टर करणार आणि एकमेकांना नीट समजावणार परीक्षेच्या हिशोबाने, अनुजला जुने पेपर मिळाले आहेत. त्याने ट्रॉपिकल रेजिओंनचा चॅप्टर एकदम पक्का केला आहे आणि मी  आर्टिकचा. मग एकमेकांना आम्ही ते शिकवणार  डाउट्स क्लिअर करणार आणि सगळ्यांचे सगळे चॅप्टर  एकदम पक्के  काही टॉपिक गुंतागुंतीचे आहेत, त्यात परीक्षा त्यामुळे हा प्लॅन.”

याला टेक्निकल टर्म : ‘इन्फॉर्मेशन ओव्हरलोड‘ – इतकी माहिती द्या की समोरचा माहिती sort करण्यातच Confuse होऊन जाईल.

गोलंदाजाने एकदम पाच बॉल टाकले की नक्की मारायचा कुठला? काकूंनी नजर स्पेक्टर समीरकडे वळली, “तू कुठला चॅप्टर केला आहेस मग”

समीर ने एकदम कॉन्फिडन्टली उत्तर दिले “१४ वा”

वातावरण एकदम शांत झाले. तिघे एकमेकांकडे बघत होती, नक्की सामना कोणी जिंकला हे काही कळेना. चेतनने मौका साधत, “चल चल, सायकल काढ, उशीर होईल आपल्याला” असे म्हणत पळ काढली. काकूंच्या मनात अजून काही येण्याआधी मौका घेऊन दोघ बाहेर पडली, सायकल वर बसली, नीट जा, लक्ष दे, अभ्यासच करा, routine instructions त्यांना मिळाले.

पाच चे पन्नास

अनुजचे घर चालत १५ मिनिटांच्या अंतरावर, सायकलने जेमतेम पाच मिनिट. तेवढ्यात आपण समीरची शाळा घेऊ असे चेतनला वाटले, “सम्या, अरे फेकताना किती confidence”. चेतनने हे वाक्य चेहऱ्यावर अशे हावभाव आणून बोलला की जसे तो जगातला सर्वात सज्जन, कधीही थापा न टाकणारे सोज्वळ बाळ आहे.

“का रे?, काय झाले?”, सम्याने पण जरा sarcastic टोनमध्ये विचारले.

“अरे ढोल! आपल्याला geography च्या पुस्तकात बाराच चॅप्टर आहेत  तू चौदावा काढला कुठून?”

“तिथूनच, जिथून तू अनुजकडे जुने exam पेपर काढले आहेत ”

हजरजवाबीला समीर एक नंबर होता. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नेहमी असायचे. त्यामुळे चेतनने पुढे विषय ताणला नाही. निघण्याच्या गडबडीत आपले थालपीट राहिले याची रुकरूक त्याला जास्त होती, सायकल आपोआप ‘आप्पाची खीचडी’ पुढे जाऊन थांबली. समोसा आणि भजी ऑर्डर केली. त्यानंतर भजी साठी उगाचच एक्सट्रा चटणी. भजी चिंचेच्या चटणीला लोक टेकून टेकून चवी पूर्ती घेतात या दोघांनी मात्र सांबरवडा घेतल्यासारखे प्लेटभर चटणी आणि त्यात भजीला अंघोळ घालून खाल्ली. नंतर लिंबू-पाणी पण झाले.

शेवटपर्येंत त्यांनी काही खिचडी ऑर्डर केली नाही. चेतनचे म्हणणे असे होते की जर अप्पाला खिचडीवर फुल्ल confidence असता तर त्याने फक्त खिचडीच ठेवली असती, समोसा बनवलाच नसता. त्यालाच त्याच्या खिचडीमध्ये confidence नाहीये तर आपण कशाला दाखवायचा. निघताना पण एक समोसा पार्सल घेतला.

Samosa

पाच मिनिटांची journey साठी पन्नास मिनटे लावत दोघे अनुजच्या सोसायटी मध्ये पोचले. अनुज स्वतः स्वागतासाठी गेटवर उभा होता, तावातावत बोलला,“अबे किती वेळ? कुठे हरवला होता, १५ मिनटे झाली चेतनच्या घरून फोन येतोय, पोहचले का नाही म्हणून!.”

अनुजला hyper ह्याची सवय होती आणि समीर आणि चेतनला त्याच्या या वाढीव स्वभावाची सवय होती त्यांनी कुठलेही रिऍक्शन दिले नाही. शांतपणे अनुजकडे बघत राहिले. अनुज जरा शांत आणि लगेच बोलला, “सामोसा?”. चेतनने सामोसा त्याला दिला. “बाबा मला विचारत आहेत, काय सांगू?” अनुजने सामोसा खात सुरवात केली, “मग मीच बोललो की झेरॉक्स काढायला थांबले असतील. मी बघून येतो असे सांगून बाहेर पडलो”. दोघे अनुजच्या घरी येण्याची हि शंभरावी वेळ होती तरी अनुज चालू राहिला, “अबे सायकल जरा आडवी लाव, त्या खांबाला टेकून, जास्त पुढे नको, अबे लॉक लावले का रे?”. कोणीही अनुजला चुकूनपण उत्तर दिले नाही.

पण हा उगाचचा शहाणपणा दाखवण्याच्या नादात अनुजलाच भान राहिले नाही, त्याच्या पार्किंग मध्ये एकच बीम होती जी एक फूट खाली होती, आणि हा पठ्ट्या बरोबर त्याच बीमला जाऊन आपटला, डोकं ठणाणले.
“अरे अनुज! तू जरा जपून, डोके सांभाळ तुझे, अरे रिकाम्या गोष्टी लगेच फुटतात”, समीरने लगेच टोमणा मारला. चेतनने ‘खी खी खी खी खी’ करत background इफेक्ट दिले.

Second inquiry

अनुज मात्र रक्त निघाले की काय या चिंतेमध्ये उगाच हाथ डोक्यावर चोळत बसला. अशे त्याने ३-४ वेळा केले. “अरे घासून घासून केस घालवशील….. टकल्या” यावेळी चेतनने टोमणा मारला, “चल वर”
अनुजचे घर पहिल्या मजल्यावर, त्यामुळे पार्टी काही क्षणातच घरात पोचली.

घरात शिरताच, बाबांनी विचारले, “का रे गर्दी होती का झेरॉक्स ला?”
“हो …ओ ” हे सामुहिक उत्तर तिघांनी दिले. उत्तर देताना स्वर पण जुळला असे म्हणावे लागेल.

“तुमचा आवाज आला मी तुझ्या घरी फोन करून सांगितलं पोहचले म्हणून. पण तुम्हाला एवढा वेळ का लागला वर येण्यासाठी, एक मजला तर आहे?”, बाबांनी विचारले.
“ते अनुजचे डोक बीमला धडकले”, चेतन ओकला, “तरी त्याला सांगत होतो लक्ष दे”
“अरे तू इथे राहतो. त्यांनी तुला नाही तू त्यांना सांगितलं पाहिजे.” बाबांनी अनुजला टोकले

अनुज डोकं खाली ठेऊन जमिनीकडे बघत बसला. पर्याय नाही, एकीकडे बाबा आणि दुसरीकडे मित्र. (हर एक दोस्त कमीना होता है)

“जा आता आत, अभ्यास करा”, बाबा बोलले आणि तिघे एका मागून एक अनुजच्या रूम कडे गेले.

इथे अभ्यास सुर्वतांम!

abhyas chalu

रूममध्ये शिरतास अनुज पुन्हा चालू झाला, “अबे, माझ्यावर काय ढकलता रे? तुम्ही उशीर केला, आणि बोलणी मला!”
“खाली समोसा खाण्याची घाई कोणाला होती वर बसून पण खाल्ला असता ना?” पुन्हा समीरने अनुजची बोलती बंद केली. Generally समीर बोलला कि समोरच्याची बोलती बंद करतो तरी सगळे मित्र विषाची परीक्षा का घेतात हि एक mysteryच आहे.

अनुजने विषय बदलला, “चला, आता आपण History चा अभ्यास करू”
“हिस्टरी का गोरेग्राफय करणार आहेस तू?” समीरने विचारले.
अनुज लगेच बोलला, “हिस्टरी आणि मी नाही आपण”
‘आपण’ ऐकल्यावर चेतन आणि समीर एका स्वरात खी खी खी करू लागले.

“अरे अंड्या वेडा आहेस का, अरे अभ्यासच करायचा असता तर माझ्या घरी नसतो का बसलो जाड्या ! आज रात्री काका काकू येणार आहेत. उशिरा २ ला पोहचतील. ते येईपर्यंत घरी सगळे जागे राहतील. मला काहीतरी वाचत बसावे लागेल म्हणून त्यापासून वाचण्यासाठी हा प्लॅन मस्त पैकी झोप काढण्यासाठी इकडे आलो आणि तू सांग हिस्टरी करू”, चेतनने संदर्भासहित स्पष्टीकरण दिले.

समीरने त्यात ऍड केले “मी पण २ दिवस नीट झोपलेलो नाही. कालच गुरुवारी २ वाजताचा पिक्चर बघण्यासाठी जागरण झाले आहे. मला सांग तू किती वाजेपर्यंत अभ्यास करणार आहेस?”

“माझा विचार होता पहाटे पाच पर्यंत आपण अभ्यास करू!” अनुजचे हे उत्तर ऐकून चेतन आणि समीरला खात्री झाले की मगाशी डोक्यावर लागलेला मार खूपच डीप इजा करून गेला आहे. दोघांनी घड्याळयाकडे बघितले आता वाजले १० आणि हा पठ्या पहाटे ५ पर्यंत जागणार! वेडा झाला कि काय.

त्याचे ambition पाहून खरे तर सम्याला हसू आले होते तरी अनुजची अजून खेचायची म्हणून तो बोलला, “एक काम कर अनुज पहाटे झोपताना तू मला उठव, मग मी अभ्यास करतो.”
चेतनला जोकमध्ये पण अभ्यासाशी संबंध ठेवायचा नव्हता, त्यामुळे तो सम्याच्या स्वरात स्वर न मिळवता पांघरून घेऊन झोपण्याच्या तयारीला लागला.
सम्याने पण पटकन पांघरून घेतले आणि अनुजला परत बोलला, “बघ अनुज, उठव काय पण ५ च्या आधी नको उठवू ….. तू नक्की जागणार आहेस ना ५ पर्यंत नाहीतर मी alarm लावतो”. खरे तर सम्या अनुजची खेचत होता. पण अनुज जोकच्या पलीकडे गेला होता. त्याचा निर्धार पक्का होता. आज Historyचा अभ्यास करून आपण इतिहास घडवणार हा दृढनिश्चय त्याने केलेला होता.

१० चे ११ झाले झोपलेली दोन कारटी आता जोरजोरात घोरू लागली होती. मित्रांच्या घोरण्यामध्ये पण सूर होता आणि अनुज पण त्या सुरात डुलु लागला. डुलत डुलत अनुज १०-१५ ओळी वाचायचा आणि मध्येच त्याला आपण काय वाचतोय त्याचा संदर्भ त्याला लागत नव्हता. मग परत १० ओळी मागे, ५ ओळी पुढे करत करत पुढच्या ४ तासात अख्खी ४ पाने वाचली!. चॅप्टर अजून १० पानांचा. असे करत करत आपले काही होणार नाही. एक काम करू अनुजन झोपण्यासाठी जागा करू लागला.
दोघांचे शांत आणि तृप्त चेहरे बघून अनुजची थोडी चीड-चीड झाली. त्यांच्या घोरण्यामुळे आपला अभ्यास झाला नाही, त्यांच्यामुळेच मगाशी बाबांची बोलणी खावी लागली आणि बघा आता कशे झोपले आहेत. या विचारांमुळे झोपेला टेकलेला त्याचा मेंदू जागा झाला, आतले किडे जागृत झाले. त्याने घड्याळ बघितले २ वाजलेले. मगाशी सम्या खूप टोमणे मारत होता ‘पाचला उठव, पाचला’.

….. “बदला”

“बदला” त्याची ट्यूब पेटली.
अनुज आता वेगळ्याच मिशनमध्ये लागला. बाल्कनी मधून स्टूल घेऊन आला, भिंतीवरच्या घडाळ्यात २ चे त्याने ५ केले. समीरचे आणि चेतनचे घड्याळ टेबलवर ठेवले होते, त्यांचे पण काटे फिरवले.

घडाळ्यात change

आणि मग जाप लावला,”‘समीर उठ, समीर उठ”
पण हे बोलताना मुद्धामहून चेतनला हलवत होता. दोघांचे डोळे उघडले, काय झालं काही कळेना. अनुजने कॅरेक्टर काही सोडले नाही, “अबे उठा उठा, ५ वाजले. तुम्ही बोलला होताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे. उठा!”
चेतनने ignore करून पुन्हा झोपण्यासाठी कुशी बदलली पण अनुज काही थांबला नाही, दोघेही उठून बसेपर्यंत तो चालू होता. दोघांची झोपमोड झाली आहे याची खात्री झाल्यावर अनुजने पांघरून घेतले आणि स्वतः झोपला.

आपण झोपण्याआधी ‘पहाटे उठव’ असे काही बोललो होतो का? हा विचार चेतनला पडला. चेतनला झोपेत काही कळेना.

समीरचा पण थोडा गोंधळ उडाला होता. तो ज्या बेडवर झोपला होता, तो बेड टेबलला एकदम चिटकून होता. उठून बसल्यावर टेबल समोर आला आणि त्यावरची पुस्तके पण. समीरने instinctively त्यातले एक पुस्तक उचलले.
समीरने पुस्तक उचललेले पाहून ‘अरे! हा तर अभ्यास करायला लागला!’ चेतनला काही कळेना. पण आता उठलो आहे तर बाथरूमला जाऊन येऊ,

confused about what book it is

समीर एखादे लहान बाळ जसे एखाद्या नवीन गोष्टीकडे बघते तसे त्या पुस्तका कडे बघू लागला,
हे कुठले पुस्तक आहे? साईझ मोठी आहे, फुलस्केप आहे work-book असावी….
पण हे तर भरलेले आहे आतापर्यंत सगळ्या वर्क बुक रिकाम्या असतात आणि त्या रिकाम्याच राहतात. पण या पुस्तकात बरेच वर्ड टाईप केलेले आहेत!
टेक्स्ट बुक दिसतंय, पण कुठलं असेल?
टेक्स्ट बुक साधारण आकाराने लहान असतात.
मोठी बुक एक तर drawing किंवा geography असते.

किंवा, हे अनुजच्या मोठ्या भावाचे पुस्तक असेलअ. पण अनुजच्या मोठ्या भावाला तर अणूजवर बिलकुल भरोसा नाही. अनुज कधी चहा, कधी पाणी सांडेल, काही भरोसा नाही. भाऊ त्याची पुस्तके अशी अनुजच्या टेबलवर ठेवण्याची risk घेणार नाही.

मग ठरलेतर हे Geography चे पुस्तक आहे!

parallel-ly, चेतनचे झोपेत बाथरूम मध्ये प्रयोग चालू होते. नळाला पाणी कसे येणार? हा प्रश्न त्याला भेडसावत होता.
‘या अंड्याला पण लई हौस! साधे गोल गोल फिरणारे नळ लावायचे, हे लिव्हर कसले आहे’, ओढलं तरी पाणी नाही
हे बटन कसले आहे, ओढून बघू आणि पिक्चर मध्ये दाखवतात तसा शॉवर चालू झाला आणि बंड्याच्या डोक्यावर पाणी!!
झोप उडाली, भिजता भिजता वाचला, थोडे शर्ट वर, तोंडावर आणि पायावर पाणी उडले होते, मेन म्हणजे, पॅन्ट ओली झाली नव्हती!

टाप टाप टाप

चेतनचा हा गोंधळ संपला, समीर अजून पण तो sure नव्हता की हे geographyचे पुस्तक आहे. अनुज पण डीप स्लीप मध्ये गेला होता. वातावरण पुन्हा शांत झाले. तितक्यात त्या शांत रात्री, एखाद्या हिंदी horror सिनेमामध्ये बॅग ग्राउंड इफेक्टला वापरतात असा ‘टाप टाप टाप’ आवाज आला.
कोणीतरी चालत चालत रूमकडे येत होते. दोन्ही गडी जरा अजूनही झोपेत होते, त्यांना काय करावे कळेना. चेतन तसाच बाथरूममध्ये आवाज ऐकत बसला, आणि समीर त्या पुस्तकांच्या रहस्यात इतका मग्न होता की त्याला बहुतेक आवाज आलाच नाही.
चेतनने बाथरूमला जाताना रूम लॉक केली नव्हती. त्यामुळे एक धक्का आणि बाबा आत !!

creaking sound door

समोरच समीर पुस्तकाकडे एकटक बघताना दिसला आणि इंस्टंट्ली “वाह!” दिली “अभ्यास जोरात चालला आहे, शाब्बास पोरा, कुठला अभ्यास करतोयस बाळा”
“geography” इन्स्टंट उत्तर समीरने नेहमीच्या confidenceने दिले.

बाबांनी विचारले, ”काय वाचतोयस?”
समीर पुन्हा confidence ने बोलला, “१४ वा चॅप्टर!”

चेतनने बाथरूम मध्ये १४वा चॅप्टर ऐकले आणि त्याची तारांबळ उडाली. अजून काही विपरीत घडण्याअगोदर पटकन बाहेर पडावे असा विचार करत पटापट तोंड हात पाय पुसून बाहेर पडला. क्षणात तो बाबांच्या मागोमाग रूम मध्ये शिरला. चेतनला बघून बाबा थोडे शॉक मध्ये गेले, एवढा वेळ त्यांना वाटत होते की अनुज बाथरूम मध्ये आहे, पण बाहेर तर चेतन पडला!.
“अनुज कुठे आहे?” बाबांनी लगेच विचारले.

समीर आणि चेतनने मराठी सीरिअलच्या अभिनेत्यासारखे एकदम स्लो मोशन, फुल्ल ड्रॅमॅटिक पणे मान वळवत पांघरुणाकडे बघितले, त्यावेळी रात्रीची शांतता असूनही सीरिअल सारखे ‘dhissch’ आवाज येत आहेत, असे फीलिंग आले.
समीर एकदम शांत आणि निरागसपणे बोलला, “अनुज ना….. तो झोपला”

उत्तर ऐकून बाबांची तळपायातली आग मस्तकात गेली. त्यांनी चेतनकडे बघितले, थोडासा टोन सावरत विचारले, “तू कुठे होतास?”
चेतन कितीही झोपेत असो, पण आग लागली आहे हे त्याला कळते आणि त्या आगेतून स्वतःला कसे वाचवायचे हे ही माहित होते. आत्ताच उठलो, असे बोललो तर आग आपल्यावर येईल. चेतनने म्हणूनच एकदम स्टाईलमध्ये तोंड पुसत उत्तर दिले, “झोप लागायला लागली होती, म्हणून बाथरूम मध्ये होतो, तोंड धुऊन झोप घालवायला गेलो, आज geography संपवायचा आहे ना!”
हे उत्तर बॉम्बच्या वातीला जाळणारी अगरबत्ती कशी एक छोटीशी लाल टिळा लावते तसे होते. चेतनने वात पेटवली आणि सुतळी बॉम्ब पासून लांब गेला, समीरच्या शेजारी जाऊन उगाचच एक पुस्तक उचलले
स्फोट होणारच होता आणि तो झाला. “अनुज उठ” इतक्या जोरात बोलले गेले की अख्ख्या सोसायटीमधले अनुज, अनिकेत, अनिवेश, अ आणि न नावात असलेले सगळे जागे झाले असतील!

अनुज ताडकण उठला आणि एका मोशन मध्ये उभा राहिला. समोरच संतापलेले बाबा, बाजूला समीर आणि चेतन हातात एक एक पुस्तक घेऊन. त्यात चेतनने तर पुस्तक पण उलटे धरलेले होते.
बाबा पुढे काही बोलले नाही, वळाले आणि हॉल मध्ये जाऊन बसले.

काही बोलले नव्हते तरी पार्टीला कळले की follow करायचे होते.
अनुजच्या मागे समीर आणि समीरच्या मागे चेतन, एक एक करून सगळे हॉल मध्ये पोहचले. अनुज एकटा बाबांसमोर जाऊन उभा राहिला, चेतन हॉलच्या दरवाज्याला धरून थांबला आणि समीरला पण जवळ ओढले.
अनुजला काय झाले आहे हे कळले नाही. पण बाबा ओरडले आहेत म्हणजे आपण कुठे तरी काशी घातली आहे, तो मान खाली घालून त्यांच्यासमोर उभा राहिला.

“काय चालले आहे. तो समीर बघ स्वतःच्या घरी अभ्यास होणार नाही म्हणून तो इकडे येऊन अभ्यास करतोय आणि तू झोपा काढ! लाज लज्जा शरम, काही नाही का?”

“अहो बाबा, मी आत्ताच झोपलो. हे झोपले होते मी एकटा अभ्यास करत होतो”, गुन्हेगाराने विनवणी चालू केली.

“मग मी काय बघितलं? चेतन मला एरवी रिलॅक्स करणारा वाटतो. तो झोप येऊ नये म्हणून तोंड धुतोय आणि तू झोपा काढ! रात्रभर अभ्यास करणार म्हणे! किती वाजता झोपलास तु?”
आता हे सगळे बोलताना बाबांचे बोट चेतनकडे होते, त्यात अनुज पण आश्चर्याने चेतनकडे बघू लागला. ‘हा अभ्यासासाठी तोंड धूत होता!’

पण लांब लपून बसल्यामुळे चेतनला नीट ऐकू येत नव्हते, त्यामुळे त्याला प्रश्न पडला अनुज आणि बाबा आपल्याकडे का बघतायेत?
चेतनने समीरला विचारले (हळू आवाजात), “ते आपल्याला बोलतायत का अनुजला? काही कळत नाहीये, लैच जोरात बोलतायत. ए सम्या तुला कळतंय का? ते आत्ता माझंही नाव घेत होते का रे?”

समीर मात्र एकटक बाबांच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. त्याला अंदाज आला होता की कुठल्या पण क्षणी आग आपल्याकडे येऊ शकते. Fire extinguisher म्हणून तो ते मगासचे पुस्तक घेऊनच आला होता. चेतनचे प्रश्न त्याला डिस्ट्रटेक्ट करत होते. पण आगीत पडणार कोण आपण की मित्र? अर्थातच वेळ आली तर मित्रालाच ढकलावे लागेल. चेतन जितक्या अंधारात राहील तितके बरे, ढकलताना सोपे जाईल! म्हणून समीरने चेतनचे सगळे प्रश्न ignore केले.

बाबांनी वॉच कडे बघत विचारले, “आता वाजलेत २:३०, तू कधी झोपलास?”
अनुजने स्वतःचा डिफेन्स चालू केला, “आता २:२० ला, मीच यांना उठवून झोपलो”

बाबांनी समीरकडे बघितले, तिघांच्यात समीरचा स्टॉक वाढलेला होता. अनुजचा ऑलरेडी डाउन होता आणि आता तर नेगेटिव्ह झाला. समीर, त्याच्या हातामधले पुस्तक, त्याचा सिंसियर चेहरा, श्रावण बाळच ते !

बाबांनी त्या समीर बाळाला एकदम हळुवार पणे विचारले, “समीर खर सांग बाळा, तुझा मित्र आहे म्हणून खोट नको बोलू. खर सांग हा अभ्यास करत होता का नाही?”
पण समीरच्या मागे लपलेल्या चेतनची वेगळीच धांदल उडाली होती. ‘२:३० कशे काय वाजले, आपण तर ५ ला उठलो, माझ्या घड्याळात तर ५:१५ वाजले होते. एकतर आपण टाइम ट्रॅव्हल केला आहे किंवा आपण स्वप्न बघतोय, असे चेतनला वाटू लागले.
पण समीर नेहमीप्रमाणे शांत, इंग्रज़ी मध्ये stoic म्हणतात. Pressure मध्ये डोके चालते त्याचे, त्याने हॉल मधल्या घड्याळात बघितले, २:३० वाजले होते, अनुजकडे बघितले, अनुजने त्याच्याकडे. समीरला त्याक्षणातच कळाले, अनुजने किडे केले आहेत.

अनुज परत बोलला, “खरंच बाबा, मी अभयास करत होतो”
बाबांनी विचारले, “हो का, कुठला अभ्यास केलास”
अनुज पटकन बोलला, “history”

बाबा चेतनकडे वळले, “चेतन तू कसला अभ्यास करत होतास? आणि समीर तू अजिबात सांगू नकोस”
चेतनला अंदाज आला होता की समीरचे पारडे जड आहे, अनुज की समीर, हिस्टरी का जॉग्रफि आणि चेतनने करेक्ट उत्तर दिले, “Geography!”
बाबांनी पुढे विचारले, “कुठपर्यंत आला होता अभ्यास?”
चेतन बोलला, “१४वा चॅप्टर!!”
अनुजला काही कळेना, geography मध्ये १४वा चॅप्टर आला कुठून, “अबे, काहीही काय .. ”

अनुजच्या तोंडातले ‘अबे’ बाबांच्या मस्तकात गेले, “अनुज! बोलण्याची काही पद्धत! एकतर खोटे बोलतोयस आणि हा वरचढ पणा कुठला!”
बाबा उठून उभे राहिले, समीर आणि चेतनला एकदम फायनल विचारले, “खरं सांगा हा तुमच्याबरोबर अभ्यास करत होता की नाही? हा कधी झोपला?”

समीरने stoic पाने एकदम शांत स्वरात उत्तर दिले, “हा अडीच तासा पूर्वी झोपला”

चेतनने पण मान डोलावली. दोघे एकदम sync मध्ये एक पाऊल मागे सरकले. बाबांना हात मोकळे करायला जागा!

Sannnn आवाज आला.

slap cartoon

आवाज ऐकून काकू पण हॉलमध्ये आल्या. झालेला प्रकार काकांनी अवघ्या १० सेकंदामध्ये सांगितला. पुन्हा sannn आवाज आला !

बाबा समीरकडे वळाले, “अरे बाळा आत रूम मध्ये जा, अनुज येईलच थोड्या वेळात”

मान डोलवत दोघे शहाणेबाळं रूम मध्ये गेली, दरवाजा बंद केला आणि ‘खी खी खी’ आवाजावर जितका कंट्रोल ठेवता येईल तितका ठेऊन करून फुदकली. तब्बल १० मिनीटांनी लाल झालेला अनुज रूममध्ये आला, “अबे, अडीच तासा पुर्वी! काही लाज आहे का नाही?”

समीरने लगेच उत्तर दिले, “तुच म्हंटला ना की तू २:२० ला झोपला” भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट दाखवत म्हंटला “बघ किती वाजले – ५:३०. जवळपास तीन तास झाले की नाही? तरी आम्ही अर्धा तास कमी सांगितला”
चेतन पण दात काढत मान डोलवत बसला.

अनुज बाल्कनी मध्ये गेला, स्टूल आणला भिंतीवरच्या घड्याळातले काटे पुन्हा फिरवले. उतरला आणि समीरच्या समोर जाऊन बसला.

चेतन आणि समीरने त्याच्या खांद्यावरून हात फिरवला. समीर म्हंटला, “जाऊ दे आता अनुज, चल आपण आत्ता १४ वा चॅप्टर करू!”

तिघे मित्र पोट धरून हसली.

अनुज तेव्हा कदाचित कमी हसला असेल दोघांच्यापेक्षा, गाल सळसळत असणार पण आज जेव्हा कधी त्या रात्रीच्या अभ्यासाची आठवण येते तेव्हा तेव्हा तो डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसतो!

1 Comment

  1. Sameer
    February 19, 2022
    Reply

    Laughed a lot.. very fond memories!!

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *