आपली स्मरणशक्ती फार फसवी असते. मागच्याच रविवारी दामूच्या लग्नात खाल्लेला मेनू आठवत नाही, पण लहानपणी रद्दीचे पैसे जोडून खाल्लेल्या मस्तानीची चव क्षणात जिभेवर येते. कोथरूडच्या उद्यानाला मी निदान पंधरा-वीस वेळा गेलो असेल, पण मला आठवते ती आमची तिसरीतली सहल.

पु ल म्हणूनच गेले आहेत, मुंबई आणि पुणे हे सोडून जगात पाहण्यासारखे तरी काय आहे! आमच्या शाळेने पु लंच्या या वाक्याला आपले ब्रीदवाक्य बनवले होते. मुंबईला जाणे महाग, म्हणून आपले कधी बंड गार्डन, कधी जंगली महाराज मंदिर, पेशवे पार्क, शनिवारवाडा — ही आमची सहलीची ठिकाणे.

असो, मूळ मुद्दा काय, तर आठवणी. शाळेतले किस्से असे आठवतात जसे परवाच झालेले आहेत. त्याचा एक मोठा भाग आहे शाळेतले शिक्षक, त्यांनी शिकवलेले विषय, त्या विषयांची पुस्तके आणि त्या पुस्तकातले काही विशेष अध्याय. आमच्या चौथीत इंग्रज़ीसाठी महाराष्ट्र बोर्ड ऐवजी दिल्ली बोर्डचे पुस्तक होते — गुलमोहर (का विचारू नका, उत्तर माहित नाही). त्या पुस्तकातल्या  दोन गोष्टी मला कायमच्या लक्षात राहिल्या आहेत. एक सिंदबादची गोष्ट होती आणि दुसरी ब्लॅक ब्युटी नावाच्या घोड्याची. सिंदाबादच्या गोष्टीत एक मोठा गोल दगड होता, ज्याच्या अवती-भवती फिरून सिंदबाद त्या दगडाचे वर्णन करत राहतो. ट्विस्ट हा होता की, तो दगड नसून एका मोठ्या पक्ष्याचे अंडे होते. त्या दगदरूपी अंड्याचे वर्णन — एक वेगळीच जादुई मजा होती.

दुसरी गोष्ट ब्लॅक ब्युटीची; ती काय मला आठवत नाही. फक्त एवढेच आठवते की सुरवातीला घोड्याचे एक सुंदर स्केच होते. अजूनही एम्प्रेस गार्डन वरून जाताना एखादा काळा घोडा दिसला तर माझ्या मनात त्या घोड्याचे नाव ब्लॅक ब्युटीच येते.

शंभर वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात पण अशाच काही गोष्टी घर करत असतील का?

१९०६ साली प्रकाशित झालेल्या मराठीच्या शालेय पुस्तकात अशाच काही रंजक गोष्टी आहेत. आज त्या वाचून, त्या काळच्या विद्यार्थ्यांच्या मनात काय चालले असेल, ही कल्पना करण्यात मजा आहे. साहित्य ही काळाची दुर्बीण असते. भारत अजून स्वतंत्र झालेला नाही, इंग्रजांनी ‘बाबू’ बनवण्यासाठी आखलेली शिक्षणपद्धत, त्यात शिकणारा एक मराठी मुलगा. त्याच्या मनात काय चालले असेल?

मराठीचे तिसरे पुस्तक ‘बाळबोध’ हे बहुदा इयत्ता तिसरी मधल्या मुलांसाठी असेल.

पुस्तकाचा व्याप मराठी कथा आणि कविता पासून भूगोलाला वळसा घालतो. पुस्तकाचा शेवट सृष्टिज्ञान आणि पदार्थावरणाने होतो. हल्ली भूगोल म्हणजे, कुठे काळी माती कुठे लाल, पिकांचे प्रकार, दगडांचे वर्गीकरण, नद्यांची नवे, असे एकदम निरस पद्धतीने शिकवले जाते. सामान्य ज्ञानाचा विषय आहे की भूगोलाचा हे कळत नाही. पण, शंभर वर्षांपूर्वी भूगोल हा ट्रॅव्हल ब्लॉग सारखा शिकवल्या जात होता, हे बघून माझे डोळे फिरले. आमच्या नशिबात हौसेने समुद्रकिनारी बसणारा नूरमहंमदास का न्हवता? त्याला समुद्रातून आलेला मासा, सागर आणि महासागर मधला फरक समजून सांगतो. असे ज्ञान मिळाल्यावर नूरमहंमदासचा पुढे जाऊन नुरसाहेब का नाही होणार. आम्हाला मात्र कधी समुद्र न पाहिलेले शिक्षक, कोणता समुद्र किती खोल, हे काठीच्या तालावर वदवून घेत होते.

कुठे सहल गेली तर परत आल्यावर सहलीचे वर्णन पॉईंट-वाईस लिहिण्याचा गृहपाठ रुपी अत्याचार आम्ही भोगला आहे. तिकडे किसनला  मात्र अत्यंत प्रेमाने जेजुरीला नेणारे त्याचे बाबा. जेजुरी कशी वाटी प्रमाणे आहे, तिच्या वायव्येकडचे सासवड, नैऋत्यचे कडेपठार, असे दाखवल्या वर कोणाच्या लक्षात नाही राहणार! डोंगर-दरींचा भूगोल, दिशांचा परिचय, डोक्यात एकदम पक्का. नाहीतर आम्ही, आमच्या साठी जेजुरी म्हणजे पुण्याच्या थोडा खाली एक छोटासा ‘टिम्ब.’

असो, स्वातंत्र्यात निरागस भूगोल शिकणे की पारतंत्र्यात हौशीचा भूगोल शिकणे, हे काय एकमेकांचे पर्याय होऊ शकत नाही.

एकंदरीत त्या वेळेची सगळी पुस्तकपद्धती इंग्रजांच्या सेन्सॉरशिप खाली असणार, त्यात स्वातंत्र्यवादी विचारांना आळा घालण्याचे काम मोठ्या प्रमाणात करणे, हे साहजिकच आहे. ज्ञान सुद्धा द्यायचे, नैतिक शिक्षण, हुशारीला प्रोत्साहन, पण स्वतंत्र विचारांवर बंदी घालणे, ही त्यांची तारेवरची कसरत. अशा कचाट्यात अडकलेल्या पुस्तक लेखकाकडे एक उत्तम पळवाट म्हणजे, बाहेरच्या गोष्टींचे अनुवाद करून लिहिणे. बायबलचा न्यायाधीशाच्या भूमिकेत सोलोमन, मराठी पुस्तकात पेशवाई पद्धतीने बाळ दोन तुकड्यात कापा सांगतो, तेव्हा तो नकळतपणे पाश्चात्य विचारांचा शिरकाव भारतीय मनात करतोय —असा समाज इंग्रज़ी सरकार करत असेल. बाहेरचे जास्त खायला घातले की घरच्या मटणाची चव जाते.

पण ज्याला आपण इंग्रज़ीमध्ये  ‘आयरोनी’ आणि मराठीत विडंबन म्हणतो, ते जीवनाचा   अपरिहार्य भाग आहे. बाहेरच्या गोष्टी आत घेताना एक गोष्ट या पुस्तकात चोरवाटेने शिरते, ती म्हणजे जार्ज वॉशिंग्टनची एक गोष्ट.  बाळ जार्जने बक्षीस मिळालेल्या कुऱ्हाडीचा प्रयोग बाबांच्या आवडत्या फळझाडाची साले तासण्यात केला. जार्जच्या बाबांना परत आल्यावर गहिंवर आले, कोणी शंभर रुपये दिले असते तरी हे झाड मी कोणाला दिले नसते (त्या काळचे शंबर, आत्ताचे दहा लाख तरी पकडा. डॉलर कि रुपये हा शोधाचा विषय राहील.) त्यांनी जार्जला विचारले, तुला माहित आहे का कोणी केले आहे, हे असे? जार्ज अमळ गोंधळाला, पण तरी त्याने सत्याची साथ सोडली नाही आणि कबुली दिली. जार्जचे सत्यवचनी रूप पाहून त्याच्या बाबांना अजूनच गहिंवर आले. त्याचे बाबा भारतीय नसल्यामुळे त्यांना, “मेल्या, गाढवा” असे शब्द माहित न्हवते, त्यामुळे त्यांनी जार्जच्या सत्यवादीपणाची प्रशंसा केली आणि झाडाला विसरून गेले.

आता जॉर्जचा गावठी जार्ज जरी झाला असेल तरी ती गोष्ट वाचणाऱ्या मुलाला हा प्रश्न तर नक्कीच पडणार. हा वॉशिंग्टन नक्की आहे तरी कोण? तेव्हा गूगल नव्हते म्हणून उत्तर शोधणे सोपे नसेल, पण तरी प्रयत्नांती परमेश्वर, कोणाला ना कोणाला जॉर्ज वॉशिंग्टनची संपूर्ण कहाणी कळलीच  असेल. तेव्हा आपला जार्ज हा तोच जॉर्ज आहे, ज्याने आपल्या अमेरिका नावाच्या देशातून इंग्रजांना पळवून लावले आणि आपला देश स्वतंत्र केला,  हे सत्य तिसरीतल्या त्या चिमुकल्या मनाला कळाले असेल. मग त्याच्या सत्यवचनी प्रेरणा तर आलीच असेल, पण त्याच बरोबर जॉर्जचे बाकीचे धोरण पण अंगी घ्याची प्रेरणा मिळाली असेल  — हीच ती आयरोनी.

असो, शालेय आठवणीं कशा दैनंदिन जीवनात घर करून टाकतात हा आपला विषय.

१९०६ सालचे हे पुस्तक किंवा याची आवृत्ती एका लहान चिंतामण जोशीने तर वाचले असेलच ना. कारण जेव्हा हा चिंतामण पुढे जाऊन लेखक ची. वि. जोशी बनतो, तेव्हा तो या सत्यवादी जार्जला विसरत नाही. आपले चिमणराव हे पात्र जेव्हा आपल्या बायकोशी चूक कोणाची आहे या विषयावर भांडते, तेव्हा ते चिमणराव आपल्या लहानपणचा किस्सा सांगतात. लहानपणी जमदग्नीचे अवतार असलेल्या बाबांच्या पुस्तकात जेव्हा आपण चूक केली तेव्हा ती चूक काबुल करण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. आपण चूक केली तर काबुल करतो हे सांगणारे चिमणराव सहज एक वाक्य बोलून जातात, “तुला सांगतो काऊ, मला वाटतं त्या जॉर्ज वॉशिंग्टन नंतर मीच तसा दुसरा.”

जॉर्ज वॉशिंग्टनचा प्रवास पुस्तका पर्यंत थांबत नाही. पुढे मराठी दूरदर्शन च्या पहिल्या मालिकेत (१९७७; चिमणराव गुंड्याभाऊ), दिलीप प्रभावळकर चिमणरावच्या भूमिकेत पुन्हा त्या जॉर्ज वॉशिंग्टनला उचकी देतात. पारतंत्र्यात अडकलेल्या लेखकाला ही कल्पना तरी असेल का, की इयत्ता तिसरीच्या पुस्तकात लिहिलेले आपली दोन वाक्य लोकप्रिय संस्कृतीचा भाग होऊन स्वातंत्र्याच्या मुक्त हवेत दरवाळतील. पुढे ते पुस्तक आणि तो अभ्यासक्रम नाहीशे झाले, जॉर्ज वॉशिंग्टन मराठीच्या पुस्तकातून इतिहासाच्या पुस्तकात लढा चालू ठेवायला गेला. पण त्याचा किस्सा मात्र बोली भाषेत राहिला. आठवणींचा वारसा कसा पुढे जाईल, ही एक अजबच गम्मत आहे.

 

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *